मोफत शिधा वितरणालाही ऊत, समाजसेवक सरसावले
प्रतिनिधी / वास्को
वास्को शहर आणि परिसरात आता किराणामाल आणि भाजी उपलब्ध होऊ लागली असली तरी दुप्पट दाम वसुली थांबलेली नाही. आणि कारवाईही फारशी कुणावर होत नाही. घरोघरी शिधा वितरणालाही ऊत आलेला असून काहींना दुप्पट अन्नधान्य तर काहींना काहीच मिळालेले नसल्याच्याही तक्रारी आहेत. घरोघरी मोफत शिधा वितरणालाही सुरूवात झालेली असून दिवाळी, चतुर्थीसारख्या सणाला करण्यात येणाऱया वितरणासारखेच वातावरण निर्माण झालेले आहे.
वास्को शहर आणि परिसरात जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना काही दिवस वणवण करावी लागली. मात्र, आता परिस्थितीत बदल झालेला आहे. किराणा दुकाने उघडी ठेवण्याचा सरकारचा आदेश असल्याने बहुतेक दुकाने मर्यादित वेळेसाठी तर काही पूर्णवेळ उघडी असतात. तर काही मालाअभावी बंदच आहेत. परंतु नागरिकांची आवश्यक वस्तूंसाठी पूर्वीसारखी वणवण होत नाही. काही दिवसांपूर्वी राजकीय प्रतिनिधी आणि त्यांच्या हस्तकांमार्फत किराणामाल घराघरांपर्यंत पुरविला गेला होता. त्यामुळे त्यावेळी समस्या थोडीफार हलकी झाली होती. त्यानंतर किराणा दुकाने आणि बागायत बाझार तसेच सहकार भांडारमध्ये सामान उपलब्ध झाले. सध्या बागायतदार आणि सहकार भांडारमध्येही माल उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. परंतु अद्यापही काही वस्तूंचा पुरवठा झाला नसल्याच्या तक्रारी असून काही जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी नागरिकांना कष्ट घ्यावे लागत आहेत. दूध वितरणात मात्र आता कोणतीही अडचण राहिलेली नाही.
काळाबाजार आणि ग्राहकांची लूट तेजीत
कांदे, बटाटे, पालेभाज्या व अन्य भाज्यांबाबतीत मागच्या आठवडय़ात वाईट परिस्थिती होती. मात्र, हळूहळू परिस्थितीत सुधारणा झाली. अधूनमधून भाजी पुरवठय़ाची कमतरता जाणवते. त्यामुळे धांदल उडते. वास्को परिसरात बऱयाच ठिकाणी उघडय़ावर भाजी व विकीचे प्रकार वाढलेले आहेत. काही ठिकाणी किराणामाल विकणारे आणि फळभाजी विकणाऱया ग्राहकांकडून दुप्पट दर आकारून लुबाडणूक करीत आहेत. वास्कोत सर्वत्र असे प्रकार आढळत आहेत. काही दुकानदारांना जास्त किमतीत माल विकत घ्यावा लागत असल्याने दुकानात माल ठेवणेच बंद केलेले आहेत. याचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. परिस्थितीत दिवसेंदिवस बदल होत असला तरी काळाबाजार आणि ग्राहकांना लुटण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. विशेष म्हणजे हे प्रकार सर्वश्रुत असलेतरी अशा विक्रेत्यांवर फारशी कारवाई होत नसल्याचे दिसून येते.
गरजूंबरोबरच सधन कुटुंबांनाही शिधा वितरण
दरम्यान, वास्को शहर व परिसरात अनेक संस्था, व्यक्ती तसेच सरकारी मदतीने बेघरांना, भिकाऱयांना, अडकलेल्या मजुरांना तसेच अन्य लोकांना जेवण पुरविण्याचे काम चांगल्या पध्दतीने होत असून अशा लोकांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आलेले आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नौदलानेही वास्को परिसरात सामाजिक कार्य चालूच ठेवले आहे. काही राजकारणी आणि दानशूर व्यक्तींनीही घरोघरी मोफत अन्नधान्य वितरणाचे काम हाती घेतले आहे. संकल्प आमोणकर व त्यांच्या पत्नी नगरसेविका श्रध्दा आमोणकर यांनी मुरगाव मतदारसंघात शिधा पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत दीड हजाराहून अधिक कुटुंबांपर्यंत त्यांनी मदत पुरविली आहे. त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. मुरगावचे माजी नगराध्यक्ष शेखर खडपकर यांनीही मोफत शिधा पुरविण्याचे काम हाती घेतलेले असून पाचशे कुटुंबाना आपण शिधा पुरविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्योगपती नाना बांदेकर यांच्या मदतीने माजी नगराध्यक्ष मनिष आरोलकर तसेच जितेंद्र शेटतानावडे यांनीही स्थानिक लोकांना घरोघरी जाऊन अन्नधान्याचे वितरण केले. माजीमंत्री जुझे फिलीप डिसोजा, समाजसेवक नझीर खान, माजी नगराध्यक्ष फियोला रेगो अशा अनेकांनी वास्को व परिसरात शिधावाटप केले आहे. यात गरजू लोक आणि सधन कुटुंबांचाही समावेश आहे.
तरीही अनेक गरजू कुटुंबे मदतीपासून वंचित
वास्को आणि परिसरात अनेकांकडून वाटप झालेले असले तरी बऱयाचठिकाणी गरजूंपर्यंत मदत पोहोचलेली नसल्याच्याही तक्रारी असून एकेकाने दुप्पट तिप्पट लाभ उठविलेला आहे तर काही वंचित राहिलेले आहेत. पूर्वी दिवाळी व चतुर्थीच्या सणाला गावातील सर्व कुटुंबांना शिधावाटप राजकारणी लोकांकडून करण्यात येत होते. आताही समाजसेवकांकडून गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा गरजू असा भेदभाव न करता घरोघरी शिधावाटप सुरू झाल्याने लोकांना सणांची आठवण होऊ लागली आहे. काही कुटूंबांना निवडणूक जवळ आल्यासारखे वाटू लागले आहे.