खरेदीदाराला मिळणार 13 वर्षांपासून साचलेला कचरा
ब्रिटनच्या डिवॉन येथील प्लायमोथमध्ये एक घर विक्रीसाठी तयार आहे. या घराची चर्चा तेथे साचलेल्या कचऱयामुळे होतेय. हे घर कित्येक वर्षांपासून रिकामी पडून होते. पण आता ते विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे घराला कुठल्याही सफाईशिवाय विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. म्हणजेच जर तुम्ही हे घर खरेदी केला तर तुम्हाला 13 वर्षांपासून साचलेला कचरा मोफत मिळणार आहे.
घराच्या छायाचित्रांनीही सर्वांना हैराण करून सोडले आहे. या घराला ब्रिटनमधील सर्वात वाईट घर (ब्रिटन्स मोस्ट डिसगस्टींग हाउस) ठरविण्यात येत आहे. घराबाहेर गवत उगवले असून आतमध्ये कचऱयाचा ढिग जमा झाला आहे. घराच्या कुंपणापासून हे गवत आता छतापर्यंत पोहोचेल इतपत वाढले आहे.
घरामधील जिन्यांवर मोठय़ा प्रमाणात कचरा दिसून येतो. या घरात राहणाऱया दांपत्याच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अन्यत्र रहायला गेला होता. त्यानंतर घर बंद राहिले होते. स्वयंपाकघरात 13 वर्षांपासून खरकटी असलेली भांडी तशीच पडलेली आहेत. अस्वच्छ सिंकसोबत गॅसशेगडीवर ठेवण्यात आलेले अन्नाचे भांडेही तसेच आहे.
घरातील स्वच्छतागृहाची अवस्था पाहून एखाद्याला ओकारीच येईल. स्वयंपाकघराचे छायाचित्र पाहून ते कुणीच खरेदी करू इच्छिणार आहे. घरात प्लास्टिक बाटल्या आणि अस्वच्छतेचा ढिग आला कुठून हे कुणालाच समजू शकलेले नाही. घराच्या मास्टर बेडरुममधील बेडवर कचरा फेकण्यात आल्याचे दिसून येते. तरीही सफाईशिवाय हे घर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.