प्रतिनिधी /पणजी
येत्या 10 ते 13 डिसेंबर 2021 रोजी होणाऱया सातव्या भारतातील आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा शुभारंभी कार्यक्रम पाटो-पणजी येथील संस्कृती भवनात पार पडला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभी पडदा खोलण्यात आला. कांपाल साग मैदान व ई. एस. जी कार्यालय या ठिकाणी सदर महोत्सव करण्याचे जाहीर करण्यात आले.
या देशातील वैज्ञानिक प्रगती कुठवर आली आहे याची प्रचिती या महोत्सवात प्रदर्शीत होणार असून गोव्यातील तमाम विद्यार्थ्यांना त्याचा आस्वाद घेता येईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या प्रदर्शनात बार्क, इस्रो, डीआरडीओ या सारख्या संस्था सहभागी होणार असून स्पोर्टस अथोरिटी ऑफ गोवाच्या कांपाल मैदानावर ही प्रदर्शनही भरणार आहे.
सदर विज्ञान महोत्सव भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच विज्ञान भारती या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने होत असून यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय कार्यकारी सचिव जयंत सहस्त्रबुद्धे हजर होते. मुख्य संयोजक डॉ. सुहास गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजनासाठी वेगवेगळय़ा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्य समित्या त्यांनी जाहीर केल्या.
विज्ञान आणि पर्यावरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव इंदिरा मूर्ती या वेळी हजर होत्या. भारतात कुठेही विज्ञान परिषद भरली तरी गोव्यातील टीम सदैव तत्पर असते असे सांगून त्यांनी गोव्यातील विज्ञान कार्यकर्त्यांची प्रशंसा केली.
गोवा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. हरिलाल मेनोन यांनी सरकारी यंत्रणा तसेच विज्ञान भारतीच्या कार्याची प्रसंशा केली व गोवा विद्यापीठाचे सहकार्य जाहीर केले. गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालक लेविन्सन मार्टिन्स यांनी या विज्ञान महोत्सवाला पूर्ण सहकार्य जाहीर केले. एन. सी. पी. क्यू आर चे संचालक व मुख्य संयोजक डॉ. मिर्झा जावीद बेग यांनी आभार मानले.