प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्ष मिळून विरोधी गटाच्या नऊ आमदारांनी काल शुक्रवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. आमदार रोहन खंवटे अटक प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी विरोधी आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी सरकारकडे बोलणी करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले त्यांना दिले. सभागृहाची शान जपणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
काल दुपारी सभात्याग केल्यानंतर विरोधी काँग्रेस पक्ष, गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्ष आमदार यांनी राज्यपालांची भेट घेतली.
राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे, रवी नाईक, सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, रोहन खंवटे, जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, आलेक्स रेजिनाल्ड यांनी राज्यपालांची भेट घेऊन खंवटे यांच्या अटकेचा विषय राज्यपालांसमोर मांडला. खोटी तक्रार करण्याविरोधात कारवाई न केल्याबद्दल यावेळी सरकारवर टीका करण्यात आली. आमदार रोहन खंवटे यांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली गेली व त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. हा प्रकार चुकीचा असून या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली.
विधानसभेत लोकशाहीचा खून
विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभापतींनी आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेस मान्यता देणे हे निषेधार्ह बाब आहे. हा गुन्हा छोटासा होता. जामीनपात्र होता पण तरीही सभापतीनी अटकेस मान्यता दिली. घटना घडली व खंवटे आणि प्रेमानंद म्हंबरे यांच्यात बोलणी झाली त्यावेळी ज्येष्ठ नेते आमदार प्रतापसिंह राणे उपस्थित होते. त्यांनी अशा प्रकारची कुठलीही घटना घडल्याचे नाकारले. महत्वाचे म्ह्णजे विधानसभेत हा मुद्दा उठवला त्यावेळी याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे तीन वेळा विधानसभा तहकूब करण्याची पाळी आली, असेही या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालून लोकशाहीच्या खुनाचा प्रकार रोखवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विरोधकांची आक्रमकता कायम
सरकार विरोधात एकत्र आलेल्या आमदारांनी आपली आक्रमकता कायम ठेवली आहे. पहिल्या दिवसापासून आक्रमक बनलेल्या आमदारांनी विधानसभेचा चौथा आणि शेवटचा पाचवा दिवस गाजवला. बुधवारी रात्री उशिरा अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना पोलिसांनी भाजपनेते प्रेमानंद म्हांबरे यांच्या तक्रारीनुसार अटक केली होती. हा मुद्दा उचलून धरीत विरोधकांनी बुधवारी अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले नाही. तीनवेळा अधिवेशन तहकूब करावे लागले. त्याचबरोबर अर्थसंकल्पावेळी पुन्हा गोंधळ केल्याने मार्शलद्वारे आमदारांना बाहेर काढण्यात आले.
शुक्रवारी शेवटच्या दिवशी विरोधी आमदारांनी पुन्हा गोंधळ घातला व दोन वेळा सभागृह तहकूब झाले. त्यानंतर मार्शलद्वारे आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. नंतर या आमदारांनी थेट राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली.