वृत्तसंस्था/ दुबई
भारतामध्ये आयसीसीच्या 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने शनिवारी या स्पर्धेच्या बोध चिन्हाचे नामकरण केले असून आता हे बोध चिन्ह ‘ब्लेझ अॅण्ड टोंक’ असे ओळखले जाईल. या बोध चिन्हाचे हे नवे नाव एकमताने निवडण्यात आले. क्रिकेट क्षेत्रामध्ये एकता आणि चुरस यांचे प्रतिक या बोध चिन्हाद्वारे शौकीनांना पहावयास मिळेल. ‘ब्लेझ अॅण्ड टोंक’ हे बोधचिन्ह क्रिकेट शौकीनांची निश्चितच करमणूक करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात भारताच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार यश धूल आणि भारताची महिला क्रिकेटपटू शेफाली वर्मा यांच्या उपस्थितीमध्ये या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी बोधचिन्हाची निवड करण्यासाठी एक बैठक बोलाविण्यात आली होती. त्याचप्रमाणे या बोधचिन्हाच्या नामकरणासाठी क्रिकेट शौकीनांकडून विविध नावांची पसंती घेण्यात आली होती. ब्लेझ हे महिला बोधचिन्ह असून टोंक हे पुरूष बोधचिन्ह आहे. तब्बल 12 वर्षांनंतर आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुन्हा भारतात होत आहे. सदर स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाईल. दरम्यान या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे दर्शन प्रत्येक सामन्यावेळी शौकीनांना मिळणार आहे. या बोधचिन्हाचा रोडशो आयोजित केला असून या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याच्या यजमान शहरामधून हा रोडशो होणार आहे. 45 दिवस सदर स्पर्धा चालणार असून भारतातील प्रमुख दहा यजमान शहरामध्ये या बोधचिन्हाचा प्रवास राहणार आहे.