दत्त कारखाना सदिच्छा भेटीवेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे प्रतिपादन
शिरोळ / प्रतिनिधी
रासायनिक खते आणि औषधांच्या माध्यमातून होत असणाऱ्या नव्या शेतीमुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे. विषमुक्त अन्न खाण्यासाठी देशी वाणांची जोपासना करणे अत्यावश्यक बनले आहे. श्री दत्त कारखान्याच्या माध्यमातून देशी वाणांच्या बियाणांची बीज बँक तयार करण्याचे काम होत असल्याचे पाहून खूप समाधान वाटले. ‘जुनं ते सोनं’ असतं या उक्तीप्रमाणे आपणा सर्वांना पुन्हा देशी वाणांच्या बियाणांकडे वळावे लागेल, असे आवाहन पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले.
शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राहीबाई पोपेरे आणि मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. दत्त कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित केलेल्या महिला बचत गट व शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन बैठकीत त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील हे होते. यावेळी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या २२ प्रकारच्या देशी वाणांच्या बियांची पाहणी करून त्यांची साठवणूक आणि वापर यासंदर्भात माहिती दिली.
बीजमाता राहीबाई पोपेरे म्हणाल्या, गेल्या तीस वर्षापासून आपण देशी बीज बँक माध्यमातून काम करीत आहोत. या उपक्रमांमध्ये तीन हजार महिला काम करीत आहेत. देशी वाण बियाणांचे महत्व आणि विषमुक्त जगण्याचे फायदे यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती करीत आहोत. दत्त उद्योग समूहात आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना पाहून आनंद वाटला. प्रयोगशीलते विषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता जाणवते. बीज बँक तयार करण्याच्या या मोठ्या प्रयत्नात या भागातील महिलाही पुढे आल्या आहेत याचा अभिमान वाटतो. दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे काळ्या आईची सेवा करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
गणपतराव पाटील म्हणाले, बीजमाता राहीबाई यांनी देशी वाण बियाणांसंदर्भात प्रचार व प्रसार करून नव्या पिढी साठी दिशा दिली आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. दत्त उद्योग समूहाला भेट देऊन शेतकऱ्यांना केलेल्या या मौलिक मार्गदर्शनाच फायदा बीज बँक, प्रयोगशील शेतकरी महिला यांना निश्चित होईल. यावेळी शेती अभ्यासक संजय पाटील यांनी देशी वाण बियाणे संवर्धन व बियाणांसंदर्भात जागतिक पातळीवर होत असलेले काम आणि देशी वाणांचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांनी आभार मानले. यावेळी योगेश नवले, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, दत्तचे संचालक इंद्रजीत पाटील, भैय्यासाहेब पाटील, शेखर पाटील, महेंद्र बागी, प्रा.मोहन पाटील, यांच्यासह भाऊसाहेब खोंद्रे, कृष्णदेव इंगळे, शामराव पाटील, महादेव मेथे, महावीर माणकापुरे, सुदर्शन तकडे, कीर्तीवर्धन मरजे, शमा पठाण, सुरेखा माणकापूरे, शैला चौगुले, हेमा मिठारी, शर्मिला केरीपाळे, रूपाली मेंगे, आक्काताई मगदूम, रुपाली कुचगावे, दीपा संकपाळ, जयश्री शिरढोणे, शेवंती चौगुले, अशोक शिरढोणे, शक्तीजीत गुरव, सुनील सूर्यवंशी, शंकर कांबळे आदी उपस्थित होते.