उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे आलमट्टी, नारायणपूर या जलाशयांमध्ये पाणीसाठा मोठय़ा प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या जलाशयांमधील पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी करण्यासाठी जलाशयातून पाणी सोडावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे.
मंगळवारी त्यांनी मान्सूनमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. याचबरोबर कोविड संसर्गाच्या नियंत्रणासाठीही उपाययोजना करण्याबाबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत अधिकाऱयांना त्यांनी ही सूचना केली आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे जलाशये 80 टक्के भरली आहेत. या पाण्याचा वापर आताच करावा, कारण अजून पाऊस होणार आहे. त्यामुळे पाणीसाठा करून ठेवण्याऐवजी त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी तसेच वीज निर्मिती व पिकांसाठीही करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
यापुढे अधिक पाऊस झाला तर पाण्याचा विसर्ग करावा लागतो. तेव्हा पाणी वाया जाण्यापेक्षा त्या पाण्याचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. ते पाणी आलमट्टी जलाशयामध्ये साठणार आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंत हे जलाशय पूर्ण भरण्याची शक्मयता पाटबंधारे विभागाचे अभियंता सी. डी. पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळेच तातडीने वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीला खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते.