वृत्त संस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर आणि जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने आपल्या पसंतीचा सर्वोत्तम जागतिक वनडे संघाची निवड केली. या संघात भारताचे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या माजी क्रिकेटपटूंचा त्याने समावेश केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने मंगळवारी जगातील सर्वोत्तम विश्व वनडे संघाची निवड जाहीर केली. या संघामध्ये भारताचे माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, लंकेचे सनथ जयसूर्या आणि माजी कर्णधार कुमार संगकारा, विंडीजचे ब्रायन लारा, कर्टली ऍम्ब्रोस, इंग्लंडचे केवीन पीटरसन आणि फ्लिन्टॉफ, पाकचे वासिम अक्रम, शोएब अख्तर आणि न्यूझीलंडचा डॅनियल व्हेटोरी यांचा समावेश केला आहे. शेन वॉर्नने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 194 वनडे सामन्यात 293 बळीं घेतले आहेत. 1999 साली आयसीसीची विश्व चषक क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱया ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याने या स्पर्धेत 20 बळी मिळविले होते. सदर स्पर्धेतील पाक विरूद्धच्या अंतिम सामन्यात वॉर्नने 33 धावांत 4 गडी बाद केले होते. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात अंतिम सामन्यात गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणारा वॉर्न हा अव्वल फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो.