अंतिम लढतीत तैपेईच्या चोऊ तियानवर एकतर्फी मात
वृत्तसंस्था/ लंडन
येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात डेन्मार्कचा अव्वल खेळाडू व्हिक्टर ऍक्सलसेनने विजेतेपद पटकावले. तसेच महिला दुहेरीत जपानची अव्वलमानांकित जोडी फुकोशिमा-हिरोटा यांनी जेतेपदाला गवसणी घातली. रविवारी रात्री उशिरा महिला एकेरीचा अंतिम सामना चीनची चेन युफेई व चिनी तैपेईची तेई तेजु यिंग यांच्यात खेळवला जाणार आहे.
रविवारी पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऍक्सलसेनने तैपेईच्या चोऊ तियानचा 21-13, 21-14 असा एकतर्फी पराभव केला. 34 मिनिटे चाललेल्या या सामन्यात ऍक्सलसेनने सुरुवातीपासून वर्चस्व ठेवताना प्रतिस्पर्धी तियानला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. प्रारंभी, ऍक्सलसेनने 7-1 अशी आघाडी घेतली होती. यानंतर पहिल्या गेमच्या मध्यंतरापर्यंत त्याने 11-3 अशी आघाडी कायम ठेवली. प्रतिस्पर्धी तियानने काही गुण मिळवत त्याला टक्कर दिली पण अनुभवी ऍक्सलसेनने शानदार खेळाचे प्रदर्शन साकारत पहिला गेम 21-13 असा जिंकला. यानंतर, दुसऱया गेममध्ये तियानकडून कडवा प्रतिकार होईल अशी अपेक्षा होती. 5-8 अशी आघाडी घेत त्याने दमदार सुरुवातही केली होती पण मोक्याच्या क्षणी त्याच्याकडून चुका झाल्याने ऍक्सलसेनने 15-11 अशी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत त्याने हा गेम 21-14 असा जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
महिला दुहेरीत जपानची फुकोशिमा-हिरोटा जोडी अजिंक्य
या स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत जपानच्या युकी फुकोशिमा-सयाका हिरोटा जोडीने डय़ू यी-यिन ली जोडीला 21-13, 21-15 असे नमवत जेतेपद पटकावले. ही लढत 39 मिनिटे चालली. जपानच्या या स्टार जोडीने अंतिम लढतीत सुरेख खेळ साकारला. विशेष म्हणजे, जपानच्या या स्टार जोडीचे या वर्षातील दुसरे जेतेपद ठरले.