अचूक बातमी “तरूण भारत”ची, सोमवार 24 जानेवारी 2022, दुपारी 12.00
● नियम पाळून शाळा गजबजल्या
● जिल्ह्यात नव्याने 1134 जण बाधित
● हॉस्पिटलाझेशनचे प्रमाण कमीच
● मृत्यूदर रोखण्यात यश
प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेत जाण्यासाठी व शाळेतील मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी आतुरलेल्या बालचमुंची सकाळपासूनच लगबग दिसून येत होती. सकाळी शाळेपर्यंत सोडायला पालकवर्ग आले होते. शाळांची घंटा वाजता आनंदीआनंद झाल्याचे वातावरण दिसून येत होते. जिल्ह्यात हॉस्पिटलायझेशन कमी झाले असून मृत्यूदर रोखण्यात यश आलेले आहे. नव्याने काल दिवसभरात 1134 जण बाधित आढळून आले असून पॉझिटीव्हीटी रेट 34.53 वर पोहचलेला आहे. रविवारी दिवसभरात 3284 जणांचे स्वॅब तपासण्यात आले.
शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण
कोरोनामुळे शाळा बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळा घेवून चांगले शिक्षण देता येत नव्हते. आता राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सोमवारी शाळा सुरु झाल्या आहेत. नर्सरी, केजीपासून ने 12 वीपर्यंतचे वर्ग सोमवारी सकाळपासून गजबजल्याचे दिसून येत होते. पालकवर्ग आपल्या पाल्यांना सकाळी मास्क, सँनिटायझर सोबत देवून शाळेपर्यंत सोडायला आले होते. शाळांच्या व्यवस्थांपनाकडून कोरोनाच्या अनुषंगाने नियम पाळून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था केली होती. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेंकर व प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी सर्व शाळांना सुचना दिल्या गेल्या आहेत. शाळांची घंटा वाजल्याने वातावरण उत्साहाचे बनले होते.
हॉस्पिटलाझेशन प्रमाण कमी, घरच्या घरीच बरे होताहेत
सौम्य लक्षणे आढळून येणारे रुग्ण आढळून येत आहेत. ते रुग्ण घरातच आयसोलेशनमध्ये राहून डॉक्टरांच्या सल्याने उपचार घेत आहेत. घरातच उपचार घेवून बरे होणाऱ्यांची संख्या चांगली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यास जिल्ह्यातील रुग्ण, नागरिक हे सहकार्य करत आहेत. कालच्या दिवसभरात 368 जण कोरोनामुक्त झालेले आहेत.
नव्याने जिल्ह्यात 1134 जण बाधित
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 3284 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले होते. त्यापैकी 1134 जण बाधित आढळून आलेले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्ही रेट 34.53 एवढा आलेला आहे. जिल्ह्यात बाधित आकडा वाढत असला तरीही बरे होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने व सर्वच नागरिक नियमांचे पालन करत असल्याने जिल्ह्यात दिलासादायक असे वातावरण आहे.
सोमवारी
नमूने – 3284
बाधित – 1134
सोमवारपर्यंत
नमूने-2467663
बाधित-269647
मृत्यू-6531
मुक्त-251467