शिक्षक भारतीच्या राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक यांची मागणी
वार्ताहर / दोडामार्ग:
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथ. शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. या पतपेढीच्या सर्व कर्जदारांचे पुढील तीन हप्ते स्थगित करावेत, अशी मागणी पतपेढीच्या अध्यक्षांकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक यांनी निवेदन देत केली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. यामुळे देशातील कर्जदारांचे तीन हप्ते स्थगित करण्याचे निर्देश आरबीआयने सर्व बँकाना दिलेले आहेत. त्या अनुषंगाने या गंभीर परिस्थितीचा परिणाम आपल्या सभासद बंधु-भगिनीनाही भोगावा लागत आहे. तसेच स्व-भांडवलार चालणारी एकमेव पतपेढी असून या मारामारीच्या काळात सर्व शिक्षकांना 75 टक्के पगार मिळणार आहे. त्यात पतपेढीची वसुली झाल्यास शिक्षक हतबल होणार असून इतरांना सहकार्य करू शकणार नाहीत. यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने सर्व संचालक मंडळाला विनंती करण्यात येत आहे की, आपल्या बँकेचे कर सल्लागारांचे मार्गदर्शन घेऊन पतपेढीच्या सर्व कर्जदारांचे पुढील तीन हप्ते स्थगित करावेत व माहे मार्चचा कर्ज हप्ता सभासदांच्या ठेव खाती जमा करावा. या बाबत तातडीची परिपत्रक सभा घेऊन सर्व सभासदांच्या हिताचा व दिलासा देणारा निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक यांनी पतपेढीच्या अध्यक्षांकडे केली आहे.