प्रतिनिधी/ निपाणी
बहुजन समाज हा 97 टक्के असूनही बहुजनांच्या बुद्धीला धर्माच्या नावाखाली गुलाम करण्याचे काम 3 टक्के समाजाने केले. त्यामुळे सत्ता गेली आहे. मात्र यापुढे तरी बहुजनांनी संघटित होऊन अर्थसत्ता, शिक्षणसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता व प्रचारमाध्यम सत्ता या पंचसूत्रीच्या आधारे सर्व क्षेत्रे काबीज करावीत. विशेषतः महिला व तरुणांनी व्यवसायात पुढाकार घेऊन छत्रपती शिवरायांची युद्धनीती व राजनीति वापरल्यास यश निश्चित आहे, असे प्रतिपादन उद्योजिका व जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा उषाताई पाटील यांनी केले.
येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सकल मराठा समाज कल्याण संस्था यांच्यावतीने एकच पर्व बहुजन सर्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिजामाता महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा, उद्योजिका दीपा जाधव-मांगूर या होत्या. स्वागत व प्रास्ताविक प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले.
पाटील पुढे म्हणाल्या, भगवा हे त्यागाचे व समर्पणाचे प्रतीक आहे. असे असताना भगव्याच्या नावाखाली बहुजनात फूट पडण्याचे काम सुरू आहे. ’इतिहास घडवला मराठय़ांनी मात्र लिहिला दुसऱयांनीच’ या प्रवृत्तीमुळे चुकीचा इतिहास समाजासमोर गेला आहे. मूठभर लोकांनी श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत केले आहे. आणि याला बहुजन समाज बळी पडत आहे हे दुर्दैव आहे.
एकेकाळी महिलांच्या शिक्षणाला विरोध करणाऱया समाजातील महिलाच उच्चशिक्षण घेऊन मोठय़ा पदांवर आहेत. हे बहुजन समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे. ’आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकातून नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवरायांशी केली जाणारी तुलना सहन केली जाणार नाही. शिवप्रति÷ानच्या नावाखाली बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकवणाऱया संभाजी भिडेनी या पुस्तकाविरोधात महाराष्ट्र बंदची हाक का दिली नाही? बहुजन समाजाने अशा लोकांपासून सावध रहावे.
राजमाता जिजाऊंचे चरित्र वाचा
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे आज शिवरायांच्या नावावर बहुजनांना पळवत आहेत. हे लक्षात घेऊन आताच सावध व्हावे तसेच महिलांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे चरित्र अवश्य वाचावे. टीव्हीवरील मालिकांच्या मायाजाळात गुरफटून जाण्याऐवजी आपल्या मुलांवर जिजाऊ- शिवबांसारखे संस्कार करावेत, असे आवाहन उषाताई पाटील यांनी केले.
यावेळी माजी आमदार काका पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, गोपाळदादा पाटील, राजेश कदम, विलास गाडीवड्डर, सकल मराठा समाज कल्याण संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, ऍड. अविनाश कट्टी, राजकुमार सावंत, विक्रम देसाई, सुप्रिया पाटील, ज्योती कदम, उमा पाटील, शांती सावंत, अनिता पठाडे, प्रा. गौरावती खराडे, सीमा पाटील, राजश्री वाघ, उषा कुरबेट्टी, धनश्री शिंदे, प्राचार्या स्नेहा घाटगे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, विविध महिला मंडळाच्या सदस्या, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.