ठोस उपाय योजनांची गरज
पाचगाव/प्रतिनिधी
शेंडा पार्क येथील ऑक्सीजन पार्क मधील झाडे शुक्रवारी दुपारी अज्ञातांनी लावलेल्या आगीत पुन्हा एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ऑक्सिजन पार्क मधील झाडांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. प्रशासनाची उदासीनता आणि मुद्दाम गवत पेटवणारे यांच्या कचाट्यात येथील झाडे सापडली आहेत.
शेंडा पार्क येथील माळावर सुमारे 40 हजार झाडे लावण्यात आली आहेत .तीन ते चार वर्षाच्या कालावधीत येथे अनेक वेळा आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. पण ढम्मा प्रशासनाला यावर कायमस्वरूपी उपाय काढता आलेला नाही . शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत येथील शेकडो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली . सुमारे तीन ते चार वर्षाच्या कालावधीत येथील झाडे थोड्याफार प्रमाणात वाढली आहेत. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आगीमुळे येथील झाडांची वाढ खुंटलेली आहे .या झाडांची चांगली निगा राखली तर येथील झाडे पुन्हा एकदा टवटवीत होतील.
आमदार ऋतुराज पाटील आणि काही सामाजिक संघटनांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी येथील आगीत भस्मसात झालेल्या झाडांना पाणी देऊन पुन्हा नवसंजीवनी दिली होती.
येथे वारंवार लागणाऱ्या आगीमुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनाही येथील काम नेहमीचेच असल्याचे वाटत आहे .अग्निशमन दलाच्या जवानानी येथील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यावेळी आर के नगर येथील अथर्व चौगुले आणि स्वयंभू गुरव या विद्यार्थ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जवानांना मदत केली.
यावेळी अग्निशमन दलाचे अभय कोळी, महेश पाटील, अनिल बागुल, गिरीश पवार, प्रा. आर. डी. पवार, प्रा. संग्राम धुमाळ यांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
आगीची ठिकाणी आढळल्या भरलेल्या दोन आगपेट्या
जिथून ऑक्सीजन पार्क मध्ये आग लागली त्याठिकाणी भरलेल्या दोन आगपेट्या नागरिकांना सापडल्या यामुळे हे गवत मुद्दामूनच पेटवल्याचे आढळून येते.
पूर्ण गवत कापणे आवश्यक
ऑक्सीजन पार्क मधील झाडांच्या मध्ये वाढणाऱ्या गवताचा लिलाव होतो .हे गवत काही जणांनी लिलावात घेतले आहे आणि शेतकऱ्यांना कापण्यासाठी दिले आहे. मात्र शेतकऱ्यांनी येथील सर्व गवत कापून नेलेले नाही .काहि जागी मोठे गवत तसेच ठेवले आहे. या गवतालाच अज्ञातांनी आग लावली आहे.
गवत वाढण्यापूर्वी कापणी आवश्यक
शेंडा पार्क येथील झाडांमधील गवताचा लिलाव होतो. लिलाव घेतलेल्या शेतकऱ्यांना येथील गवत वळण्यापूर्वी गवत कापून घेण्याची सक्ती होणे गरजेचे आहे. म्हणजे येथील गवत आणि पर्यायाने झाडे आगिच्या भक्ष्यस्थानी पडणार नाही.