वार्ताहर / औंध :
औंध संपूर्ण महाराष्टासह, उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चैतन्यदेवता, कुलस्वामिनी श्रीयमाईदेवीचा वार्षिक पौषी रथोत्सव शनिवार 11 रोजी औंध येथे होणार आहे. ऐतिहासिक रथोत्सवासाठी औंधनगरी सज्ज झाली असून गावातील रथमार्ग सुशोभित करण्यात आला आहे.
मागील एक शतकाहून ही अधिक वर्षाची परंपरा असलेल्या श्रीयमाईदेवीच्या रथोत्सव, यात्रोत्सवासाठी औंधनगरी सजली आहे. रथोत्सवामुळे भाविकांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. आज दुपारी बारा वाजता येथील ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिरात श्रीयमाई देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब यांच्या हस्ते श्रीयमाई देवीचे पूजन केले जाणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार, पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, माजी आ. शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, माजी आ. प्रभाकर घार्गे, सुंदरगिरी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनिल माने, प्रभाकर देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजयराव काळे, अर्जुन खाडे, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, माजी सभापती संदीप मांडवे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधिक्षिका तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार अर्चना पाटील आदी प्रमुख मान्यवर तसेच विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
श्री यमाईदेवीच्या पूजनानंतर रथोत्सव सुरू होणार आहे. रथोत्सव झाल्यानंतर पुढील दहा दिवस देवीच्या उत्सवाप्रित्यर्थ श्री यमाई देवस्थान व औंध ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रा भरविली जाणार आहे. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, श्वान स्पर्धा, कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले जाणार असून विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
यात्रोत्सव काळात येणाऱया भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून ज्यादा एसटी गाडय़ा, मिनी बसेसची सोय केली जाणार आहे. पोलीस, होमगार्ड, गृहरक्षक दलामार्फत सुरक्षेचे उपाय योजले आहेत. रथोत्सवामुळे औंध गावातील रथमार्गासह परिसरातील अन्य मार्गांची स्वच्छता करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी, रांगोळया काढण्यात आल्या असून प्रसाद विक्रीचे स्टाँल्स उभारले आहेत. भाविकांसाठी मुख्यमार्ग सोडून ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे. श्री यमाई मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.