एलएसीनजीकच्या पुलाचे करणार उद्घाटन ः चीनसोबतच्या झटापटीची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तवांगमध्ये चीनसोबत झटापट झाल्यावर पहिल्यांदाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज अरुणाचल प्रदेशच्या दौऱयावर असणार आहेत. यादरम्यान संरक्षणमंत्री हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) लागून असलेल्या सियांग भागात बीआरओकडून निर्मित एका महत्त्वाच्या पुलाचे उद्घाटन करणार आहेत. अरुणाचल प्रदेशच्या एकूण 4 सीमावर्ती पुलांचे उद्घाटन केले जाणार आहे.
देशभरातील एकूण 22 सीमावर्ती पुलांचे ई-उद्घाटन यावेळी होणार आहे. याचबरोबर राजनाथ सिंह हे अन्य सीमावर्ती रस्ते प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. बीआरओनुसार सियांग जिल्हय़ात सियाम ब्रिजसह एकूण 4 पूल अरुणाचल प्रदेशात तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या एलएसीवर एकूण 8 नव्या पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री हे आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱयावर असणार आहेत.
9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना पिटाळून लावले होते. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या सैन्य कमांडर्सदरम्यान झालेल्या ध्वजबैठकीनंतर तणाव कमी झाला होता.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे मंगळवारी एलएसीवर तैनात सैनिकांची भेट घेणार असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी 25 डिसेंबर रोजी भारतीय सैन्याच्या कोर कमांडरने देखील तवांगच्या सीमाचौकीवर पोहोचून तेथे तैनात सैनिकांचा उत्साह वाढविला होता. तसेच सैनिकांच्या दृढतेचे कौतुक केले होते.
पूर्व लडाख आणि आता अरुणाचल प्रदेशात चीनच्या सैन्याकडून होणाऱया आगळीकीदरम्यान बीआरओ एलएसीवर सीमावर्ती पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पायाभूत सुविधांमुळे सैन्याला सहजपणे सीमेवर पोहोचता येणार आहे. तसेच सीमावर्ती भागात राहणाऱया स्थानिक लोकांनाही याचा लाभ होणार आहे. मागील वर्षी चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर एकूण 103 प्रकल्प बीआरओने पूर्ण केले आहेत. यात 67 पूल, 30 रस्ते, 2 हेलिपॅड आणि निवासव्यवस्था सामील आहे.
एलएसीवर आता भारताची पायाभूत सुविधा चीनच्या तोडीची झाल्याचा दावा बीआरओच्या महासंचालकांनी केला आहे. 1962 च्या युद्धानंतर भारताने चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमधील विकासकामांवर फारसे लक्ष दिले नव्हते. परंतु एक दशकापासून भारताने चीनप्रमाणेच सीमेवर रस्ते, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठा वेग दिला आहे.