आंदोलन केले तरच जाग येणार काय? : न. पं. बैठकीत नगराध्यक्षांची नाराजी
वार्ताहर / कणकवली:
जनतेच्या समस्या मांडूनही जर प्रश्न सुटत नसतील, तर आंदोलन केले तरच दिलीप बिल्डकॉन व महामार्ग प्राधिकरणला जाग येणार का? आठवडय़ापूर्वी शहरातील समस्या सोडविण्याची मागणी करूनही त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. उपअभियंता भारत पाटील हे फोन उचलत नाहीत. त्यांना आंदोलन होणे अपेक्षित आहे का, असा सवाल करीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱयांना जाब विचारला. यावेळी सोमवारपर्यंत शहरातील बहुतांशी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱयांनी दिले.
येथील न. पं. मध्ये नगराध्यक्ष दालनात दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱयांसोबत झालेल्या बैठकीत नलावडे यांनी शहरातील हायवेच्या समस्यांबाबत पुन्हा लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, ऍड. विराज भोसले, शिशीर परुळेकर, बंडू गांगण, अभय राणे, किशोर राणे, राजू गवाणकर व दिलीप बिल्डकॉनचे उदयवीर चौधरी, कपिल शर्मा आदी उपस्थित होते.
अपघात सत्र थांबवा!
जानवली पुलाला जोडणारा रस्ता व नवीन पुलाच्या जॉईंटवर अर्धा फुटाची उंची असल्याने येथे अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी अशाच कामामुळे वागदे येथे अपघात झाला. त्यामुळे ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा समोर येत आहे, असा आरोप बंडू हर्णे यांनी केला. यावर हे गॅप तातडीने बीसी लेअरने भरून घेण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले.
डायव्हर्शनचे रस्ते सुस्थितीत करा!
पटवर्धन चौकापासून शहरात डायव्हर्शनच्या रस्त्यांच्या ठिकाणी उंच-सखल भाग झाला आहे. यात दुचाकी घसरून अपघात होत आहेत. याबाबत सूचना देऊनही काम झाले नाही. शहरातील महामार्गालगत स्ट्रीटलाईटचे बल्ब गेल्याने काळोख असतो. हायवेचे व सर्व्हीस रोडलगत गटाराचे काम सुरू आहे. त्यामुळे पादचाऱयांना चालण्यासाठी रस्त्याचा अंदाज येत नाही, याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले. यावर ही कामे तातडीने सुरू करण्याची ग्वाही चौधरी यांनी दिली.
त्या नाल्याची समस्या तशीच
ऍड. उमेश सावंत यांच्या घराकडील नाल्यात सांडपाणी साचले असून हा नाला अद्याप मोकळा करण्यात आला नाही. जमिनीच्या मूळ उंचीपेक्षा नवीन नाला एक ते दीड फुटाने उंच करण्यात आल्याने तेथे पाणी साचून राहण्याचा प्रश्न यापुढे कायमच राहणार आहे. त्यामुळे नवीन नाल्याच्या तळाला घातलेले काँक्रीट ब्रेकरने काढून लेव्हलला आणले पाहिजे अन्यथा पुढील कित्येक वर्षे ही समस्या तशीच राहणार, याकडे नलावडे व हर्णे यांनी लक्ष वेधले. त्यावर प्रत्यक्षात पाहणी करून यावर मार्ग काढण्यात येईल, असे शर्मा यांनी सांगितले.
मोबदला नाही, तेथे काम नाही!
शहरातील हायवेत बाधित होत असलेल्या अनेक जमीन मालकांना अद्याप नोटीस किंवा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे शहरातील सर्व्हीस रोडचे काही भागातील काम रखडल्याचे चौधरी यांनी सांगितले. बाधित प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळेपर्यंत काम करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्या जमीन मालकांना मोबदला देण्याबाबत कार्यवाही करा त्यानंतरच तेथील काम सुरू करा, असे नलावडे यांनी सांगितले.