सिंधुदुर्गातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची प्रतिक्रिया
- डॉक्टरांनी धीर दिल्यामुळे मनोबल उंचावले!
- कोरोना दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळा!
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
‘जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरनी मला खूप मोठा धीर दिला. सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱयांनी केलेल्या उपचारांमुळेच महाभयंकर कोरोनापासून जीवदान मिळू शकले. सर्वांचा मी शतश: आभारी आहे’ अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रुग्णाने ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी जिल्हय़ातील प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्स ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करून मुंबईहून सिंधुदुर्गात येताना कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. मेंगलोर एक्सप्रेसने प्रवास करणाऱया कर्नाटकमधील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर त्या एकाच रेल्वे डब्यातून प्रवास करणाऱया सिंधुदुर्गातील सातजणांचा शोध घेण्यात आला. त्यात नडगिवे येथील एक रुग्ण कोरोनाबाधित झाल्याचे आढळले. त्याला 25 मार्चला जिल्हा रुग्णालयाच्या ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाची लागण झाल्यापासून 14 दिवसांनंतर त्या रुग्णाचे 24 तासात दोनवेळा कोरोना नमुने तपासणी करण्यात आली. दोन्ही तपासण्यात निगेटिव्ह रिपोर्ट आला. त्यानंतर या कोरोनामुक्त रुग्णाला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
डिस्चार्ज मिळाल्यावर तरुण भारतशी बोलताना ते म्हणाले, मी मंगलोर एक्सप्रेसने प्रवास केल्यामुळे 25 तारीखला जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून दाखल केले. त्यानंतर आपला कोरोना तपासणी नमुना घेतला असता आपण कोरोनाबाधित झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आपण कोरोना बाधित झाल्याचे समजताच कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून आपण वाचणार कसे, अशी मनात भीती निर्माण झाली. कोरोनाचा वाढता फैलाव आणि बळी जाणाऱयांची वाढती संख्या पाहून अधिकच भीती वाटत होती. परंतु, आपल्या मनातील भीती डॉक्टरांनी घालवली.
‘घाबरून जाऊ नका. तुम्ही बरे होणार आहात, असा मोठा धीर डॉक्टरनी दिला. मनातील भीती काढून टाका. तुम्हाला सर्व औषधोपचार करणार आहोत. त्यामुळे तुम्ही बरे होणार आहात. फक्त मानसिकदृष्टय़ा तुम्ही स्ट्रॉंग रहा’, अशाप्रकारे डॉक्टरनी धीर दिल्यामुळे आपले मनोबल उंचावले. आपण कोरोना बाधित रुग्ण असूनदेखील नंतर भीती वाटली नाही. त्यामुळे जे काही औषधोपचार दिले जात होते, त्याला प्रतिसादही देत होतो. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव आपल्याला काहीच जाणवला नाही. आजारी असल्यासारखे वाटलेच नाही, असेही ते म्हणाले.
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये असूनदेखील गेल्या 16 दिवसांत कधीच कसला त्रास वाटला नाही. प्रत्येक डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय व इतर सर्व कर्मचाऱयांनी आपल्याला खूपच चांगली आरोग्य सेवा दिली. रोजच्या रोज विचारपूस करून औषधोपचार केले जात होते. त्यामुळेच कोरोनासारख्या महाभयंकर रोगातून आपण वाचू शकलो. मला जीवदान मिळवून दिले, अशा सर्व डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱयांचा शतश: आभारी आहे. आपली आईसुद्धा खोकल्याच्या आजाराने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. तीही आता बरी आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनामुक्तीमुळे समाधान, मात्र जबाबदारी वाढली : डॉ. चाकुरकर
कोरोनामुक्त झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज देताना खूप आनंद आणि समाधान वाटत आहे. आता कोरोना बाधित असलेला एकही रुग्ण जिल्हय़ात नाही. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त असल्याचे म्हणण्यास हरकत नाही. असे असले तरी सर्व आरोग्य यंत्रणा पूर्ण सतर्क आहे. एकही रुग्ण कोरोना बाधित नाही, अशी परिस्थिती कायम ठेवण्यासाठी आपली जबाबदारी अधिक वाढली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी व्यक्त केली. हा रुग्ण शोधला नसता किंवा शोधायला वेळ लागला असता, तर अजून कितीजणांना कोरोना संक्रमण झाले असते, हे सांगता आले नसते. परंतु, वेळीच शोध घेतल्यावर जिल्हय़ात कोरोनाचे संक्रमण झाले नाही. रुग्णाचे समुपदेशन करून मनोबल उंचावले. त्यांची एकटेपणाची भावना कमी केली. सर्व डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱयांनी खूप चांगले काम केले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. जिल्हय़ातील नागरिकांनी काळजी घ्यावी. आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही कायम सज्ज आहोत, असेही डॉ. चाकुरकर यांनी सांगितले.