अवध्या 12 तासात तपास पूर्ण, अनेक पोलिसांना बक्षिस जाहीर
प्रतिनिधी/ मडगाव
अवघ्या 12 तासात खुनाचे एक प्रकरण सोडविण्यास गोवा पालिसांना यश आले असून या खून प्रकरणी एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.
झारखंड येथील जयलेश्वर खाद्रा याचा खून करण्यात आला होता. मूळ झारखंड येथील व सध्या धारगळ -पेडणे येथे राहात असलेल्या विक्रम उर्फ तबडे खाडिया, सतिश खाडिया, विपीन खाडिया, संजय खाडिया व विनोद कुल्लू याना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले तेव्हा या आरोपींना 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला.
पोलीस अधीक्षक श्री. गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार 22 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्रीनंतर गस्तीवर असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱयाला एक व्यक्ती धारगळ येथे रेल्वे रुळावर पडलेली असल्याचे आढळून आले. त्यानी ही खबर वरच्या अधिकाऱयांना कळविली तेव्हा रेल्वे रुळावर पडलेल्या त्या व्यक्तीला इस्पितळात नेण्यात आले. डय़ुटीवर असलेलया डॉक्टरांनी ‘मृताववस्थेत आणले’ अशी नोंद केली.
ज्या व्यक्तीला या इस्पितळात आणले होते त्या व्यक्तीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. याचाच अर्थ कोणीतरी त्याचा खून केला होता आणि मयताला रेल्वे रुळावर आणून ठेवले होते. काही वेळाने त्याच्या अंगावरुन रेल्वे जाणार होती आणि मयत रेल्वे अपघातात ठार झाला असा आभास करण्याचा आरोपींचा डाव होता. मात्र, मयताच्या अंगावरुन रेल्वे जाण्यापूर्वीच मयत तपास यंत्रणेच्या हाती लागला आणि आरोपींचे बिंग उघडकीस आले.
खून झाल्याचे समजताच पोलीस अधीक्षक श्री. गावस यानी एक पोलीस पथक तयार केले. रेल्वे पोलीस उपअधीक्षक सेराफिन डायस यांच्या नेतृत्वाखाली हे पथक होते. पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस या प्रकरणाचा सध्या तपास करीत आहे.
सर्व प्रथम मयताची ओळख या पथकाने काढली. मयत व्यक्ती धारगळ येथील विजय सरमळकर यांच्याकडे कामाला होता. मयत जयलेश्वर खाद्रा हा एका महिलेसोबत येथे कामाला होता.
त्याचबरोबर वरील आरोपीसह एकूण 7 जण श्री. सरमळकर यांच्याकडे कामाला होते. 21 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला मयत व आरोपी धारगळ येथील एका बारमध्ये बसले. तेथे त्यांनी दारु ढोसली. त्यानंतर आरोपीनी मयताला धारगळ येथील रेल्वे रुळाकडे येण्यास भाग पाडले. झारखंड तेथे मयतावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
खुनाचे कारण
हल्ला करण्याचे कारण झारखंडमध्ये मयताचे व आरोपींचा क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता व त्या वादाचा वचपा काढण्यासाठी वरील पाचही आरोपींनी मयताला रेल्वे रुळावर नेऊन खून केला होता आणि रेल्वे रुळावर मृतदेह ठेवला होता.
काही वेळानंतर येथून रेल्वे जाणार होती आणि मयताच्या अंगावरुन रेल्वे गेल्यानंतर अपघातात जयलेश्वर खाद्रा दगावला असा आभास तयार झाला असता. मात्र, रेल्वे गॅगमनने रेल्वे रुळावर असलेला मयताचा मृतदेह वेळीच पाहिला आणि आरोपींचे गणित चुकले.
पोलिसांनी मयत व्यक्ती कोठे राहात होता व त्याचे नाव शोधून काढले आणि त्यानंतर या पाचही आरोपींना चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेण्यात आले तेव्हा बऱयाच वेळाने आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला.
या पाचही आरोपींना खुनाच्या आरोपावरुन भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली अटक केली असून न्यायालयाने त्यांना 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
वरील पोलीस पथकामध्ये साहाय्यक उपनिरीक्षक अरुण देसाई, पोलीस शिपाई निलेश सावंत, अमरदीप चौधरी, श्रीनिवास रेड्डी, तेजस धुरी, प्रदीप गावकर, तानाजी राणे, विराज मलीक, प्रवीण राणे, समीर शेख तसेच साहाय्यक उपनिरीक्षक सुभाष नाईक यांचाही समावेश होता.
हे खून प्रकरण सोडविण्यास जबाबदार असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱयांचे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी अभिनंदन करुन त्यांना बक्षिस जाहीर केले आहे.