बुलेट ट्रॅक्टर धडकेत एक तर त्याच ट्रॅक्टरला कार धडकून दोन ठार
प्रतिनिधी / जत
जत साखर काखान्यांसमोरून जाणाऱ्या विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग वर रविवारी रात्री झालेल्या विचित्र आपघातात तीन जण ठार झाले. पहिल्यांदा ट्रॅक्टरला बुलेटची धडक झाल्याने यात तालुक्यातील कुंभारी येथील तरुण जागीच ठार झाला. तर याच ट्रॅक्टरला विजापूरकडून येणारी स्विपट गाडीही जोरात धडकून त्यातील दोन जण ठार व चार लोक जखमी झाले. मृत कणमडी जिल्हा विजापूर येथील असून, यात पिता पुत्राचा मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी, रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जत साखर कारखान्याच्या गेटजवळ ट्रॅक्टर व मोटरसाकल अपघातात मोटरसाकलवरील कुंभारीचा युवक ओंकार उर्फ रवी तातोबा माळी वय-२२ हा युवक जागीच मयत झाला. ओंकार उर्फ रवी माळी हा आपल्या कुंभारी गावाकडे जात असताना कारखाना गेटजवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगाने गाडी कारखान्याच्या आत वळवत असताना पाठीमागून धडक दिल्याने मोटर सायकल स्वार जागीच मयत झाला. अपघाताच्या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक याने ट्रॅक्टर तेथेच सोडून पळ काढला.
दरम्यान, हा आपघात झाल्यानंतर चार तासाच्या अवधी नंतर रस्त्यावर उभ्या राहिलेल्या आपघाटग्रस्त ट्रॅक्टरला वेगात येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरात पाठीमागून धडक दिल्याने कारमधील दोनजण मयत झाले असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीला उपचारासठी हलविण्यात आले आहे.सर्वजण एकाच कुटुंबातील आसून कर्नाटकातील कनमडी जि. विजयपुर येथील आहेत.
जत-सातारा रोडवर जत साखर कारखाना गेटजवळ रात्री झालेल्या ट्रॅक्टर- मोटरसाकल अपघाता नंतर ट्रॅक्टर रस्त्यावरच उभे राहिल्याने रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिल्याने कारमधील प्रशांत प्रभाकर भोसले (वय-३५) व त्यांचा दोन वर्षाचा मुलगा मनिकांत भोसले ( दोघे रा. कनमडी) हे जागीच मयत झाले. तर याच कुटूंबातील आई इंदुमती (65), भाऊ प्रवीण (२८), पत्नी भाग्यश्री (३०), मुलगी कार्तिकी (वय ६) असे जखमी झाले आहेत.
हे सर्व जण सातारा जिल्हातील खंडोबाच्या पालीला मुलाचे जावळ काढण्यासाठी चालले होते. मात्र समोर आलेल्या वाहनांमुळे ट्रॅक्टर थांबलेला न दिसल्याने हा अपघात घडला. पहाटे शव विच्छदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची जत पोलिसांत नोंद झाली असुन आधीक तपास जत पोलीस करीत आहेत.