अनावश्यक फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद व दंडात्मक कारवाई करणार!
प्रतिनिधी / सांगली
गावात एक मे पासून कडकडीत लॉकडाऊन सुरु असूनही कोरोना रुग्णसंख्या थांबता थांबेना. गेल्या चार दिवसापासून रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे मणेराजूरीचे सरपंच वआपत्ती व्यवस्थान समितीने पोलीस बंदोबस्ताबरोबरच कमांडोना बंदोबस्तासाठी पाचारण केले आहे.
रविवारपासून हे शासनमान्यता असलेल्या अॅकेडमीचे सहा कमांडो मणेराजूरीत दाखल झाले व त्यांनी लगेचच गावात लॉगमार्च काढला यामध्ये एक महिला कमांडोचा ही समावेश आहे ;या सर्वाची मणेराजूरी विकास सोसायटीत रहाणेची सोय केली आहे. त्यामुळे हे चोवीस तास बंदोबस्तात असणार आहेत.
गावासह वस्ती भागात विनाकारण गर्दी, विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करणार आहेत. यांच्याबरोबर दोन पोलीस कॉस्टेबल व चार होमगार्ड ही बंदोबस्तात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विनाकारण व पॉझिटिव्ह असतानाही फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात गावातील कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.