●कोरोना काळात आरोग्याचे बिगारी गेले तीन दिवस संपावर
●म्हणे पालिकेच्या तिजोरीत नाही पैसा
●आरोग्य विभागातले नवीन अधिकारी झालेत शहराचे कारभारी
●खासगी सक्शन गाडीचे पाकीट कोणाला?
●समनव्यक कम लिपिकाची नेमणूक आधाराविना?
प्रतिनिधी/सातारा
सातारा पालिकेत अलीकडच्या काही दिवसांमध्ये पालिकेतील आरोग्य विभागाची घडी विस्कटली गेली आहे.टक्क्यांमुळेच वादातीत असलेला विभाग सुधारणेऐवजी आणखी गर्तेत सापडत आहे.गेल्या पाच महिन्यापासून स्वच्छतेच्या बिगारी कर्मचाऱ्यांना पगार दिला नसल्याने तिसऱ्या दिवशी ही काम बंद आंदोलन सुरूच होते.त्यांचे पगार काढण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत खडखडात आहे असे सांगण्यात येत आहे.आरोग्य विभागात अनेक गंमती दडल्या असून नवीन अधिकारी म्हणू लागलेत आम्हीच शहराचे कारभारी आहोत.खाजगी सक्शन गाडीचे पाकीट कोणाच्या खिशात जाते?,समनव्यक म्हणून नेमणूक असलेला लिपिक आधाराविनाचे काम करत असून तोच सेटलमेंट करत असल्याची चर्चा जोरदार चर्चा आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छ भारतच्या नावाखाली फक्त खाबूगिरी झाली.त्यातूनच एका ठेकेदाराने केलेले कामाचे बिल काढून घेण्यासाठी आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला होता.आता कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने शहर स्वच्छतेचे काम करणारे आरोग्यचे बिगारी कर्मचारी गेल्या पाच महिन्यापासून विना पगार काम करत आहेत.अगोदर ठेकेदाराकडून पिळवणूक केली जाते आणि आता तर संकट काळात तेवढाही पगार नाही.गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे शहरात कचरा ठिकठिकाणी दिसतं आहे.पालिकेच्या पदाधिकारी, अधिकारी यांना संघटनेचे गणेश दुबळे हे भेटले होते.आमच्या हातात नाही असे सांगून प्रशासन हात झटकत आहे.म्हणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याचे सांगण्यात येत आहे.यावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात सध्या एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था असून ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर सातारा शहरात आरोग्य राखले जाते, स्वच्छता केली जाते त्यांच्यावरच दांडगावा केल्याचे दिसून येत आहे.नव्याने नेमलेले तिन्ही अधिकाऱ्यापैकी दोन जण तर आपणच आता शहराचे कारभारी आहोत.आपल्या पाठीशी नेत्यांचा हात असल्याचे सांगून कामकाज करतात.त्यात पालिकेत असलेली आरोग्य विभागाच्या सक्शन गाडीला मागणी आली की खाजगी सक्शन गाडीचा नंबर देऊन त्याच्याकडून पाकीट कोण घेतो, अशी जोरदार चर्चा आहे.
लिपिक कम समनव्यकाची नेमणूक आधाराविना?
काही वर्षांपूर्वी पालिकेत असाच ठराव घेतला आणि चार अभियंते घेतले.36 कर्मचाऱ्यांचा प्रश्न तसाच पिचत पडला आहे.असे असताना ही शहरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी को-ओरडीनेटर म्हणून नियुक्त केलेल्या विशाल सुर्व्हे यांच्याबाबत सभागृहात जेव्हा ठराव घेण्यात आला होता तेव्हाच सातारा विकास आघाडीचे जेष्ठ नगरसेवक ऍड.दत्ता बनकर यांनीच चित्री उडवून दिली होती.नेमणूक कधी झाली?,शहराच्या 40 वॉर्डाची माहिती आहे का?,देण्यात येणारा 30 हजार पगार कसा देणार?,आदी प्रश्न विचारले होते.तेव्हा सुर्व्हे यांची बोलती बंद झाली होती.हे सुर्व्हे पालिकेचे ट्विटर अकाउंट हँडल करतात, आरोग्य विभागतले ऑन लाईन व्यवहार सांभाळतात, अगदी कोणत्या ठेकेदारास कोणता ठेका द्यायचा यासाठी ऑन लाईन खटपट करण्यात माहिर असतात.त्यांच्या नेमणुकीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये गफला असल्याची चर्चा आहे.