5 शिवशाही बस जळून खाक, 1 कोटी 20 लाखांचे नुकसान
सातारा / प्रतिनिधी :
सातारा बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बसेस बंद अवस्थेत उभ्या होत्या. सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास यातील एका बसला आग लागली. क्षणार्धात या आगीने उग्र रूप धारण केल्याने शेजारील चार बसही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. एका माथेफिरुने ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, आगीत पाच बसचे सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरुन दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून ते दोघेही मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आगीबाबत तपास करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. तीन अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग आटोक्यात आणली.
सातारा बसस्थानकानात चारही बाजूने खाजगी शिवशाही उभ्या केल्या आहेत. गेल्या कित्येक महिन्यापासून या बसेस बसस्थानकात धुळखात उभ्या आहेत. स्थानकातल्या बसेसमध्ये सेव्हनस्टार इमारतीच्या बाजूलाच उभ्या असलेल्या बसमधील भगिरथी या खाजगी शिवशाही बसने सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पेट घेतला. त्या बसेसला लागूनच अरहम या खाजगी शिवशाहीने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आग निदर्शनास येताच बसस्थानकात असलेले एसटीचे कर्मचारी, पोलीस, प्रवाशी यांनी सातारा अग्निशामक दलाच्या बंबास बोलवले. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
तीन अग्निशामक दलाच्या बंबांने ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, 1 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आगार प्रमख रेश्मा गाडेकर यांनी मीडियाशी बोलताना दिली. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांना विचारणा केली असता आगीचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि सहअधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.