जपान ओपन बॅडमिंटन : पीव्ही सिंधू पुन्हा एकदा फ्लॉप
वृत्तसंस्था/ टोकियो
येथे सुरु असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल खेळाडू पी व्ही सिंधू पुन्हा एकदा फ्लॉप ठरली. बुधवारी झालेल्या सलामीच्या सामन्यातच तिला स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. दुसरीकडे, कोरियन ओपन चॅम्पियन सात्विक-चिराग शेट्टी या भारतीय जोडीने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तसेच पुरुष एकेरीत लक्ष्य सेन, के. श्रीकांत, प्रणॉय यांनीही दुसरी फेरी गाठली आहे.
बुधवारी महिला एकेरीच्या सलामीच्या सामन्यात सिंधूला चीनच्या झांग यीकडून 21-12, 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला. 32 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूची कामगिरी खूपच खराब राहिली. विशेष म्हणजे, यंदाच्या वर्षात पहिल्याच फेरीत बाद होण्याची तिची 13 वी वेळ ठरली आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत असलेल्या सिंधूने या सलामीच्या सामन्यात अनेक चुका केल्या. याचा तिला फटका बसला.
पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग शेट्टी दुसऱ्या फेरीत
अलीकडील काळात भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या व जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील भारताच्या सात्विक-चिराग या भारतीय जोडीने जपान ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या लिओ कॉर्नेडो-डॅनियल मार्टिन या जोडीला 21-16, 11-21, 21-13 असे पराभूत केले. हा सलामीचा सामना 39 मिनिटे चालला. आता, दुसऱ्या फेरीत त्यांची लढत डेन्मार्कच्या जेप्पी बे – लासी मोल्डे या जोडीशी होईल.
लक्ष्य सेन, प्रणॉयची विजयी सलामी
पुरुष एकेरीच्या सलामीच्या सामन्यात किदाम्बी श्रीकांतने तैवानच्या आठव्या मानांकित चोऊ तियानचा 21-13, 21-13 असा पराभव केला. 29 मिनिटे चाललेल्या या लढतीत श्रीकांतने सुरेख खेळ साकारला. आता, त्याची पुढील लढत मायदेशी सहकारी एचएस प्रणॉयविरुद्ध होईल. दुसरीकडे, प्रणॉयने सलामीच्या सामन्यात चीनचा अव्वल खेळाडू व सहावा मानांकित शी फेंग लीवर 21-17, 21-13 असा विजय संपादन केला. प्रणॉयने या सामन्यात शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना प्रतिस्पर्धी फेंग ली ला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही.
कॅनडा ओपन चॅम्पियन लक्ष्य सेनने या स्पर्धेत विजयी सलामी देताना मायदेशी सहकारी प्रियांशु राजावतला पराभवाचा धक्का दिला. रोमांचक झालेल्या या सामन्यात राजावतने लक्ष्यला चांगलीच टक्कर दिली पण अखेरीस त्याला 15-21, 21-12, 22-24 अशी हार पत्करावी लागली. आता, लक्ष्य सेनचा पुढील सामना जपानच्या केंटा सुनायामाशी होईल. याशिवाय, अन्य लढतीत भारताचा युवा खेळाडू मंजुनाथला सलामीच्या सामन्यात बाहेरचा रस्ता धरावा लागला. त्याला चीनच्या वेंग होंगने हरवले.