चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना यांचाही मदतीचा हात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे माजी कर्णधार व महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी पीएम केअर्स फंडाला 59 लाखांचा निधी देत कोव्हिड 19 विरुद्धच्या लढय़ासाठी आपलेही योगदान दिले आहे तर चेतेश्वर पुजारानेही निधी दिला आहे, मात्र याचा तपशील त्याने गुलदस्त्यातच ठेवला.
या फंडात भरीव निधी दिलेल्या क्रिकेटपटूंत विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केदार जाधव या विद्यमान खेळाडूंचा समावेश आहे. माजी खेळाडूंपैकी सचिन तेंडुलकरने भरीव योगदान दिले आहे. गावसकर हे सध्या समालोचक व विश्लेषक म्हणून कार्यरत असून त्यांनी निधीचा तपशील जाहीर केला नव्हता. मात्र मुंबई रणजी संघाचा माजी कर्णधार अमोल मुजुमदारने या संदर्भात ट्विट केल्यानंतर गावसकर यांच्या जवळच्या सूत्रांनी त्याला दुजोरा दिल्यानंतर निधीची रक्कम उघड झाली.
‘कोव्हिड रिलीफ फंडात गावसकर यांनी 59 लाख रुपये दिल्याचे नुकतेच ऐकले. यापैकी 35 लाख पीएम केअर्समध्ये तर 24 लाख रुपये मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये दिले आहेत. खूप मोठे योगदान दिलात, सर’, असे मुजुमदारने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. चेतेश्वर पुजारानेही कोव्हिड 19 विरुद्धच्या लढय़ातील आघाडीवरील योद्धे डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ, पोलीस यांचे आभार मानले आहेत. जीव धोक्यात घालून हे सर्व योद्धे निःस्वार्थ सेवा बजावत आहेत. ‘मी व माझ्या कुटुंबियांनी पीएम केअर्स फंड तसेच गुजरात मुख्यमंत्री फंडात निधी दिला आहे. तुम्ही सुद्धा निधी देऊन या लढय़ातील योद्धय़ांना सहकार्य कराल अशी मी आशा करतो,’ असे त्याने म्हटले आहे. ‘या लढय़ात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचेच ठरणार असल्याने या कार्यास सर्वानी यथाशक्ती हातभार लावावा. आम्ही सर्व एकत्र येऊन या संकटावर मात करूया. या लढय़ात आघाडीवर असणाऱया वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कर्मचारी, पोलीस, दुकानदार व अन्य अनेकांनी समर्पण, धाडसी वृत्तीने कार्य करीत देशसेवा व मानवसेवा बजावली आहे आणि अजूनही करीत आहेत, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,’ अशा भावनाही पुजाराने व्यक्त केल्या.
याआधी बीसीसीआयने पीएम केअर्समध्ये 51 कोटी, क्रिकेटपटू सुरेश रैनाने 31 लाख आणि उत्तरप्रदेश मदतनिधीसाठी 21 लाख रुपयांचा निधी दिला आहे. अन्य देणगीदारांत सचिन तेंडुलकर, पीव्ही सिंधू, पी. गोपीचंद व अन्य खेळाडूंचा समावेश आहे.