वृत्तसंस्था/ डोहा
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार 36 वर्षीय सुनील चेत्रीने आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करण्याच्या यादीमध्ये अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लायोनेल मेसीला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात सर्वकालीन सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत पहिल्या दहा फुटबॉलपटूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी चेत्रीला आता केवळ एका गोलाची जरूरी आहे. चेत्रीने आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 गोल नोंदविले आहेत.
सोमवारी रात्री येथे झालेल्या 2022 च्या फिफा विश्व करंडक आणि 2023 च्या एएफसी आशिया चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात सुनील चेत्रीने दोन गोल नोंदविले. चेत्रीच्या या कामगिरीमुळे गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाने विश्वचषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला. सुनील छेत्रीने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 गोल नोंदविले आहेत. सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत पोर्तुगालचा क्रिस्टीयानो रोनाल्डो 103 गोलासह पहिल्या स्थानावर आहे. अर्जेंटिनाच्या मेसीने 72 गोल नोंदविले आहेत. चेत्री आता मेसीपेक्षा दोन गोलानी आघाडीवर आहे. मेसी आता सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत तिसऱया स्थानावर आहे. गेल्या गुरूवारी झालेल्या विश्व करंडक पात्र फेरीच्या फुटबॉल सामन्यात चिलीविरूद्ध मेसीने आपला 72 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला होता.
भारतीय संघाचा कर्णधार छेत्रीला फुटबॉल क्षेत्रातील सर्वाधिक गोल करणाऱया पहिल्या दहा फुटबॉलपटूंच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी आता केवळ एका गोलाची जरूरी आहे. संयुक्त अरब अमिरात संघातील फुटबॉलपटू अली मेबखोत हा 73 गोलासह तिसऱया स्थानावर आहे. हंगेरीचा कोसिस, जपानचा कामामोटो आणि कुवेतचा बशर अब्दुल्ला यांनी आतापर्यंत प्रत्येकी 75 आंतरराष्ट्रीय गोल नोंदविले आहेत. भारतीय फुटबॉल फेडरेशनचे प्रफुल पटेल यांनी भारतीय फुटबॉल संघाचे अभिनंदन केले असून चेत्रीच्या विक्रमाची प्रशंसा केली आहे.