निफ्टी नवीन विक्रम नोंदवत स्थिरावला : महिंद्रा ऍण्ड महिंद्रा मजबूत स्थितीत
वृत्तसंस्था / मुंबई
सणासुदीच्या कालावधीनंतर बाजाराचा प्रवास पुन्हा नव्याने सुरु झाला आहे. चालू आठवडय़ातील पहिल्याच दिवशी मंगळवारी सेन्सेन्स तेजीसोबत बंद झाला होता. मंगळवारी आशियाई बाजार सकारात्मक होते. विदेशी निधी प्रवाहाच्या जोरावर बुधवारी सेन्सेक्सने 44,000 अंकांचा टप्पा गाठून नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
आर्थिक कंपन्यांच्या समभाग लिलावामुळे बाजाराची स्थिती मजबूत झाल्याने नवा विक्रम नेंदवण्यास बाजाराला यश मिळाले. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 227.34 अंकांनी वधारुन निर्देशांक 44,180.05 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64.05 अंकांच्या मजबुतीसोबत निर्देशांक नवीन विक्रम नोंदवत 12,938.25 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या जोरावर महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे समभाग सर्वाधिक 10 टक्क्यांनी वधारले आहेत. सोबत लार्सन ऍण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक आणि कोटक बँक यांचे समभागही नफ्यात राहिले आहेत. दुसऱया बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, टायटन, टीसीएस आणि भारती एअरटेलचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
विदेशी गुंतवणुकीचा फायदा हा बाजाराला मोठय़ा प्रमाणात उठविता आला आहे. यामुळे आर्थिक आणि वाहन कंपन्यांच्या समभागांनी तेजीसोबत देशातील बाजाराला नव्या उंचीवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येही सकारात्मक लिलाव झाल्याचे पहावयास मिळाले आहे. अन्य आशियाई बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे नफा कमाईत राहिले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, बिहारची निवडणूक आणि यासोबतच सणासुदीच्या काळातील विविध उद्योगधंद्यांमधील उलाढालीचा झालेल्या सकारात्मक लाभाचा फायदा बाजाराला झाला.