आयटी, औषध कंपन्या नफ्यात, सेन्सेक्स 194 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था
मुंबई
जागतिक सकारात्मक संकेतामुळे सोमवारी शेअर बाजाराने तेजीकडे आपला कल दाखवला आहे. आठवडय़ाची बाजाराची सुरूवात तेजीने झाली असून सेन्सेक्स दिवसअखेर 194 अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी 67 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. कोरोनाच्या लसीसंबंधीच्या यशाच्या बातमीने बाजाराला मजबुती मिळवता आली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
सोमवारी 30 कंपन्यांच्या बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 194.90 अंकांच्या तेजीसह 44,077.15 आणि निफ्टी निर्देशांक 67 अंकांच्या वाढीसह 12926.45 अंकांवर बंद झाला. आयटी आणि औषध कंपन्यांच्या समभागांमध्ये तेजी राहिली होती. ओएनजीसी आणि आरआयएलसारख्या कंपन्यांच्या समभागांमुळे बाजाराला मजबुती मिळू शकली. बँकिंग आणि वित्तसंस्थांच्या समभागांमध्ये निरूत्साह दिसून आला. जागतिक बाजारांचा विचार करता डोव फ्युचर्समध्ये तेजी दिसली तर अमेरिकेतील बाजार घसरणीसह बंद झाले. आशियाई बाजार मात्र तेजीसह बंद झाले. सोमवारी सेन्सेक्समधील 20 समभागांमध्ये तेजी दिसली. ओएनजीसी, इंडसइंड बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, आरआयएल, एचसीएल टेक, टीसीएस आणि सनफार्मा या कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर दुसरीकडे एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, ऍक्सीस बँक, टायटन, एसबीआय आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.
आयटी आणि धातु कंपन्यांच्या समभागांनी सोमवारी तेजी दाखवली आहे. फार्मा कंपन्यांचे समभागही नफ्यात होते. निफ्टीच्या 11 प्रमुख कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. आयटीचा निर्देशांक 3 टक्के वाढ दर्शवत होता तर फार्मा क्षेत्राने 2 टक्के वाढ दर्शवली होती.
कोरोनासंबंधीच्या महत्त्वाच्या लसींना मिळणारे यश पाहता जागतिक स्तरावरच सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. या जागतिक सकारात्मक वातावरणाचा फायदा बाजाराला झाला.