जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांच्यावर वाय. पी. कांबळे यांचा आरोप
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाच्या नावाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी अधिकार नसताना लक्ष्मीदर्शन घेऊन बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या असल्याचा खळबळजनक आरोप सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाय. पी. कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील प्रतिनियुक्तीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना अधिकार नसून ते अधिकार पुणे विभागाला आहेत. असे असताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी मर्जीतल्या अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडील अधिकारी व कर्मचार्यांच्या लक्ष्मीदर्शन घेऊन कोरोनाच्या काळात बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या केल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी सूचना, कायदा, नियम पाळले नाहित. पुढार्यांचे ऐकूण इतरांच्या बदल्या केल्या आहेत. परिणामी यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे प्रतिनियुक्त्यासंदर्भात दाद मागितली असल्याचे जि. प. आरोग्य सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
जिल्हा परीषद आरोग्य सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाय. पी. कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.