प्रतिनिधी / सातारा
महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने दि.23 ते दि.25 या दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी सातारा ते कराड असा पायी आक्रोश मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली आहे.
त्या मोर्चाच्या अनुषंगाने नुकतेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मोर्चाला सुरुवात दि.23 रोजी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पायी चालत हा मोर्चा कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी जवळ दि.25 पोचणार आहे. निवेदनात महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जदारांना जाहीर केलेले 50 हजार अनुदान तातडीने द्यावे, लॉकडाऊन काळात घरगुती व व्यावसायिक लाईट बिल माफ करावे, सक्षम यंत्रणा नेमुन पुढील कार्य करावे, शेती पंपाचे बिल माफ करावे, सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी एकरक्कमी ऊस दर द्यावा, जे कारखाने देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, गाईच्या दुधाचे पाच रुपये अनुदान देण्यात यावे, या मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दि.23 रोजी सकाळी 9 वाजता पोवईनाका येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देऊन पुढे कराडकडे रवाना होणार आहे. काशीळ येथे पहिला मुक्काम करून दि.24रोजी पुन्हा कराडच्या दिशेने रवाना खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन देऊन खोडशी येथे सायंकाळी 5 वाजता मुक्काम, दि.25रोजी उठून पुन्हा रवाना होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देण्यात येणार आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर शांतता आंदोलन करून निवेदन देऊन दुपारी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रीती संगम येथे शेतकरी चिंतन आंदोलन होणार आहे, असे त्यांनी सांगितले.