प्रतिनिधी / हातकणंगले
हातकणंगले तालुक्यात ऊस भरणीच्या कालावधीमध्ये रासायनिक खतांचा तुटवडा शेतकऱ्यांना जाणवत आहे. रसायन खतासाठी शेतकऱ्यांना अनेक दुकाने पालथी घालावी लागत आहेत तरी सुध्दा खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
हातकणंगले तालुक्यात बी बियाणे आणि औषधे व रसायन खत विक्री करणारी अंदाजे तीनशे ते चारशे दुकाने असून या दुकानांमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे व रसायन खताचा पुरवठा केला जातो परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावाने केलेला लॉकडाऊनचा फटका या दुकानदारांना तसेच शेतकऱ्यांनादेखील बसला आहे. दुकानदारांच्याकडे पुरेसे रासायनिक खत उपलब्ध होत नसल्याने व त्यांच्या जवळचा पूर्ण माल संपल्याने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यास हे दुकानदार असमर्थ दिसत आहेत. तर शेतकऱ्यांना अनेक दुकाने पालती घालून सुध्दा पुरेसे रसायन खत मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आता हवालदिल झाला आहे.
यंदाच्या वर्षी पाऊस काळ मुबलक झाल्याने तालुक्यात मागील वर्षीपेक्षा अधिक प्रमाणात ऊस शेती केले आहे. पावसाळ्याच्या अगोदर या शेतीची भरणी करणे आवश्यक असते. या भरणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा डोस दिला जातो मात्र आता रासायनिक खताचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. अनेकांनी रसायन खत न देताच ऊसाची भरणी केली आहे. शासनाने तात्काळ या रसायन खताचा पुरवठा करावा अशी मागणी सध्या शेतकर्यांतून होत आहे.