प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथील महाविद्यालयासमोरील वळणावर आज एक ट्रक 30-35 फूट खोल नदीत कोसळल्याने चालकासह दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, आज दुपारी एक वाजता हा दहा चाकी ट्रक एम.एच. 14- एफ.टी. 7299 मुंबईच्या दिशेने चालला होता. तो हातखंबा महाविद्यालयासमोरील वळणावर आल्यावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रक 30-35 फूट खोल असलेल्या नदीत कोसळला. या अपघातात चालक सहदेव भिमराव लोखंडे (वय 29, रा. यवतमाळ) व संतोष दशरथ भालेराव (वय 30, रा. पुणे) हे दोघेजण जखमी झाले. अपघातस्थळी लोकांची गर्दी झाली. काहींनी त्यांना ट्रक केबिनमधून बाहेर काढून वरती रस्त्यावर आणले. महामार्ग पोलिस तातडीने अपघातस्थळी आले व त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठविण्यास मदत केली.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली. त्यातून दोघा जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले.