अनेक ठिकाणी रस्त्याच्या काँक्रिटला भेगा : गटारांचे कामही निकृष्ट
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू असले, तरीही कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी सातत्याने होताना दिसत आहेत. कामाच्या दर्जाकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. ठेकेदाराला जरी काम देण्यात आले असले तरीही त्यावर ‘सुपरव्हिजन’ करणारी यंत्रणाही सक्षम नसल्याचे हे उदाहरण आहे. चौपदरीकरणाचे काम करणाऱया ठेकेदारावर पुढील काही वर्षांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे, म्हणून त्याने निकृष्ट दर्जाचे काम करावे, असे ‘कायद्यात’ नाही. मध्यंतरीच्या कालावधीत मोबदल्यापासून अनेक गोष्टींत श्रेयवादाचे राजकारण झाले. तरीही या कामाच्या दर्जाबाबत होणाऱया दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक पातळीवर अनेक निकृष्ट कामे बंद पाडण्यातही आली व येत आहेत. मात्र, करोडेंची रक्कम खर्च होणाऱया या कामाबाबत ‘आळी मिळी गूप चिळी’ का? असा सवाल उपस्थित होत आहे.
यात चौपदरीकरण करण्यात आलेल्या सिमेंटच्या रस्त्यांना वाहतूक सुरू होण्याअगोदरच पडलेल्या भेगा, काही ठिकाणी खराब झालेले काँक्रिट, काही ठिकाणी उखडलेले डांबरीकरण, शहरातील सर्व्हिस रोडच्या कामाचा दूरवस्था, भयावह स्थितीत बांधण्यात येत असलेली गटारे अशा अनेक कमी दर्जाच्या कामांचा समावेश आहे. वास्तविक या कामाच्या दर्जाबाबत राजकीय मंडळींपासून ते सर्वसामान्यांनी जाब विचारायला हवा. कारण जरी रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीवर असली, तरीही पुढील काळात पॅचवर्क वा दुरूस्तीवर दुरूस्ती केलेल्या रस्त्यातून प्रवास करावा लागणार आहे.
सुपरव्हिजन कोणाचे?
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची जबाबदारी ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणवर आहे. या कामावर उपअभियंता, शाखा अभियंता कार्यरत आहेत. ठेकेदार कंपनीकडून जे काम चालते त्यावर सुपरव्हिजन करण्याची जबाबदारी ही संबंधीत यंत्रणेचीच आहे. मात्र, ही यंत्रणा सक्षम असेल, तर काम निकृष्ट होणे अपेक्षित नाही. तरीही अनेक ठिकाणी काँक्रिटच्या रस्त्याला भेगा गेल्यात. काही ठिकाणी रस्त्याला लेव्हल नाही. काही ठिकाणी काँक्रिट उखडले आहे.
सर्व्हिस रोडची गटारे धोकादायकच
शहरांच्या ठिकाणी असलेल्या उड्डाणपूल असेल अथवा बॉक्सेल असेल, अशा ठिकाणी सर्व्हिस रोडलगतच्या गटारांतील पाणी नेमके कुठे जाऊन पुढे जाणार याचा पत्ताच नाही. त्यात या गटारांची कामे सुरू असतानाच कोसळत आहेत. या गटारांवर टाकण्यात येत असलेल्या स्लॅबवरून भविष्यात पादचारी चालत जाणार. कारण सर्व्हिस रोडची रुंदी कमी आहे. मात्र, अशावेळी हा स्लॅब कोसळून दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती आहे. मात्र, रात्री अपरात्री होणाऱया या गटारांच्या कामांवरही कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते.
आताच जाग न आल्यास…
मोबदला व इतर विषयांच्यावेळी श्रेयवादाचा विषय आला त्यावेळी अनेकांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले. राजकीय टिकाटिपण्याही झाल्या. मात्र, त्यानंतर सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत कुणी बोलत नाही. गावागावातील होणाऱया रस्त्यांच्या वा अन्य कामांच्या दर्जाबाबत शेकडो तक्रारी होत आंदोलने होतात, कामे बंद पाडली जातात. मात्र, या कामाबाबत दुर्लक्ष केला जात आहे. कामे सुरू असताना आजच ही कामे योग्य दर्जाची करून घेण्याबाबतचा पुढकार घेत तशी कामे करून घेतली पाहिजेत. अन्यथा भविष्यासाठी हे आणखीन त्रासदायक असणार आहे.