स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीचा उपक्रम : कचरा टाकणाऱयांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावणार
वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कचरा टाकून गलिच्छ वातावरण निर्माण करणाऱयांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर राहणार आहे. शिवाय कोणीही रस्त्याकडेला कचरा टाकताना सापडल्यास 5 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर यांनी केले आहे.
बेळगाव शहराच्या हद्दीला लागून असलेल्या हिंडलगा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच चालली आहे. त्याप्रमाणेच काही बेजबाबदर नागरिकांमुळे परिसरात अनेक ठिकाणी नागरी समस्यांनी डोके वर काढले आहे. त्यामध्ये कचऱयाची समस्या सर्वात मुख्य ठरली असून, कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडीची सोय असतानाही नागरिक व परिसरातील व्यावसायिक घरगुती आणि दुकानातील कचरा रस्त्याकडेला कोठेही टाकून गलिच्छ वातावरण निर्माण करत आहेत. परिणामी अनेक दिवस कचरा एकाच ठिकाणी पडून कुजल्याने सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरत आहे. याचा आजुबाजूचे रहिवासी व वाहनधारकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा सूचना करूनदेखील नागरिक घरगुती कचरा घंटागाडीकडे न देता पंचायत कर्मचाऱयांची नजर चुकवून रस्त्याकडेला टाकत अस्वच्छता पसरवत आहेत. त्यामुळे ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील कचऱयाची समस्या कायमचीच निकालात काढण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्या हिंडलगा, विजयनगर, गणेशपूरसह इतर 12 ठिकाणी कॅमेरे बसविण्याच्या मोहिमेला मंगळवार (दि. 22) पासून सुरुवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी माहिती देताना अध्यक्ष नागेश मनोळकर यांनी यापुढे कोणीही कचरा टाकताना सापडल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घेत घरगुती व दुकानातील कचरा घंटागाडीकडे देऊन गावच्या स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या पंचायतीच्या कार्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. यावेळी उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर, माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रामचंद्र मनोळकर, मिथुन उसुलकर, सुरेंद्र अनगोळकर, पांडुरंग गावडे, संगीता पलंगे, आरती कडोलकर, परशराम येळ्ळूरकर, संतोष पिल्ले, सुरेंद्र अनगोळकर आदी सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.