जात-उत्पन्न दाखल्यावर एजंटाची किमया
प्रतिनिधी/ बेळगाव
तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभाराचा मनस्ताप बेळगावच्या नागरिकांना बसत आहे. एका हिंदू व्यक्तीला मुस्लीम जातीचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने मागील आठ दिवसांपासून ही व्यक्ती प्रमाणपत्रातील चुकीचा उल्लेख दुरुस्तीसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे सामान्य व्यक्तीला नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
सध्या विविध योजनांसाठी जात व उत्पन्नाचा दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच अल्पसंख्याक विभागाच्यावतीने महिलांना अनुदान दिले जात असल्याची अफवा पसरल्याने अनेक महिला जात व उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. याचा फायदा एजंटांना होत असून 500 ते हजार रुपये घेऊन जात व उत्पन्नाचा दाखला दिला जात आहे. विशेषत: शनिवार खूट परिसरातील काही झेरॉक्स सेंटर तसेच एजंट यामध्ये अग्रेसर असल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे.
मुचंडी परिसरातील एका व्यक्तीने एका एजंटाकडे जात व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पैसे दिले होते. त्या एजंटने सर्कल तसेच तलाठींकडून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करताच फाईल तहसीलदार कार्यालयाकडे दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही शहानिशा न करता प्रमाणपत्र जारी केले. हिंदू व्यक्ती असताना त्या व्यक्तीला मुस्लीम जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्या व्यक्तीला कर्जासाठी जात व उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा होता. परंतु, कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकीमुळे मागील आठ दिवसांपासून चुकीची माहिती बदलण्यासाठी कार्यालयाचे हेलपाटे घालत आहे.
कार्यालयात सर्वत्रच सावळागोंधळ
जात व उत्पन्नाचा दाखला देताना आवश्यक सर्व कागदपत्रांची पडताळणी होणे गरजेचे असते. परंतु, एजंटांकडून मिळत असलेल्या मलिद्यामुळे त्यांच्याकडून आलेल्या फाईलची कोणत्याही प्रकारे पडताळणी केली जात नाही. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींचा वचक नसल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.