वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारताचा पुरूष हॉकी संघ पुन्हा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी शारीरिक तंदुरूस्ती गाठण्याच्या समीप असल्याचे मत प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी व्यक्त केले. मध्यंतरी कोरोना महामारी समस्येमुळे भारतीय पुरूष हॉकी संघाच्या ऑलिंपिक तयारीला मोठा फटका बसला होता.
पुढील वर्षीच्या प्रारंभापासून पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉकी सामन्यांना प्रारंभ होईल, अशी आशा प्रशिक्षक रीड यांनी व्यक्त केली आहे. भारतीय पुरूष हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळण्याची संधी उपलब्ध झाल्यानंतर हा संघ टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी आपल्या पूर्वतयारीला लागलीच प्रारंभ करेल. कोरोना महामारी समस्येमुळे 2020 च्या जुलै महिन्यात होणारी टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. हॉकी इंडियाच्या मदतीने आम्ही पुढील वर्षीच्या प्रारंभी भारतीय पुरूष हॉकी संघाकरिता सामने आयोजित करण्याची योजना आखली आहे. भारतीय हॉकी संघामधील असलेल्या त्रुटी कमी करण्याकरिता सरावाची जरूरी आहे, असेही रीड यांनी सांगितले.
बेंगळूरमधील साईच्या केंद्रामध्ये भारतीय हॉकी संघासाठी जवळपास 20 आठवडय़ांचे राष्ट्रीय शिबीर घेतले गेले. या सराव शिबिरात भारतीय हॉकीपटूंनी कसून सराव केला. त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल आपण समाधानी असल्याचे रीड यांनी म्हटले आहे. कोरोना समस्येमुळे भारतीय हॉकीपटूंना बऱयाच कालावधीसाठी सरावापासून वंचित व्हावे लागले होते पण गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक दडपण नसल्याने त्यांना पुन्हा ताजेतवाने होण्याची संधी लाभली आहे. पुढीलवर्षी होणाऱया टोकियो ऑलिंपिकसाठी हा संघ आता पूर्ण फिटनेस गाठण्याच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक रीड यांनी व्यक्त केली.