नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आशियाई कांस्य विजेते अंकिता रैना व प्रज्नेश गुणेश्वरन यांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी व बलराम सिंग, एनरिको पिपेर्नो यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. अंकिता व प्रज्नेश यांनी जकार्ता व पलेम्बंग येथे संपन्न झालेल्या 2018 आशियाई स्पर्धेत एकेरीत कांस्यपदके जिंकली होती. अंकिता ही भारताची एकेरी (182) व दुहेरीतील (95) सर्वोत्तम मानांकित खेळाडू असून पुढील महिन्यात ती टोकियोत ऑलिम्पिक पदार्पण करण्याची अपेक्षा आहे.
‘आम्ही यंदा अंकिता व प्रज्नेश यांची अर्जुन पुरस्कारासाठी तर बलराम सर, पिपेर्नो यांची आजीवन योगदानाकरिता ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस करत आहोत’, असे राष्ट्रीय टेनिस फेडरेशनने वृत्तसंस्थेला कळवले.
28 वर्षीय अंकिता मागील 3 वर्षांपासून बिली जीन किंग कप चषकात भारताची महत्त्वाची खेळाडू रहात आली आहे. मागील वर्षी देखील तिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. पण, त्यावेळी आशियाई सुवर्णजेता दिविज शरण हा या पुरस्काराचा मानकरी ठरला. विद्यमान भारतीय पथकात प्रज्नेश हा सर्वात प्रगल्भ खेळाडू म्हणून ओळखला जातो. गुडघ्याच्या प्रॅक्चरमुळे मागील 5 वर्षे गमवावी लागली नसती तर आता कदाचित वेगळे चित्र दिसले असते, असे त्याच्या प्रगल्भ खेळामुळेच म्हटले जाते.
चेन्नईचा हा 31 वर्षीय डावखुरा टेनिसपटू सध्या एटीपी मानांकन यादीत 148 व्या स्थानी असून त्याने पाच वेळा डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. आजीवन पुरस्कारासाठी नामांकित बलराम सिंग मागील 50 वर्षांपासून भारतीय टेनिसशी संलग्न राहिले असून पिपेर्नो यांनी 1991 ते 2001 या कालावधीत सलग 27 वेळा भारताच्या डेव्हिस चषक संघाला प्रशिक्षण दिले आहे.
अजातशत्रू बलराम सिंग
अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी खास ओळख असणाऱया बलराम सिंग यांनी 1989 (दक्षिण कोरिया) व 1990 (जपान) डेव्हिस चषकात भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. याशिवाय, 1966 मध्ये ते स्वतः ज्युनियर विम्बल्डन व ज्युनियर युएस ओपन क्वॉर्टरफायनलपर्यंत पोहोचले आहेत. कनिष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बलराम सिंग ट्रस्टची स्थापना केली. सध्या ते वरिष्ठ निवड समितीचे सदस्य असून त्यांनी या समितीचे अध्यक्षपद यापूर्वी भूषवले आहे.
आशुतोष सिंग व शालिनी ठाकूर या त्यांच्या मुलांनी देखील व्यावसायिक टेनिस स्पर्धांमध्ये बऱयापैकी मजल मारली आहे. आशुतोषने फेनेस्टा नॅशनल्स स्पर्धा जिंकली व डेव्हिस चषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूत त्यांचा समावेश होता. शालिनीने देखील फेडरेशन चषक स्पर्धा खेळली आहे.
पिपेर्नो आशियाई रौप्यजेते
59 वर्षीय पिपेर्नो यांचेही उल्लेखनीय योगदान असून ते स्वतः 1982 आशियाई चषक स्पर्धेत रौप्यजेते ठरले. शिवाय, भारताचा पहिला ग्रँडस्लॅम विजेता महेश भूपतीला 1997 ते 2003 या कालावधीत प्रशिक्षण दिले. लियांडर पेससमवेत देखील ते काही दौऱयावर होते. त्यांनी 2000 ते 2012 या कालावधीत भारतीय फेडरेशन चषक संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. शिवाय, राष्ट्रीय महिला संघासाठी बुसान (2002), दोहा (2006), ग्वांग्झू (2010) आशियाई स्पर्धेतही प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडली. गतवर्षी माजी डेव्हिस कप प्रशिक्षक नंदन बाळ हे ध्यानचंद पुरस्काराचे मानकरी ठरले होते.