राजापूर-ओणीत महामार्गाचे काम सुरू असताना दुर्घटना
शहर वार्ताहर/ राजापूर
तालुक्यातील ओणी येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर काम करीत असलेला डंपर मागे घेताना मागील चाक साईड दाखवणाऱया तरूण कर्मचाऱयाच्या अंगावरून गेल्याने त्यामध्ये तरूण ठार झाल्याची घटना घडली. यामध्ये मनोजकुमार सीताराम बैगा (22, रा. उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सध्या राजापूर तालुक्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाचे काम जोरदार चालू असून अनेक परप्रांतिय कामगार काम करीत आहेत. मनोज कैल प्रजापती (रा. सिध्दांत हॉटेल पन्हळे राजापूर) हा डंपरमधून (एमएच07 एजे 0566) उडान पुलाच्या भरावाच्या कामी मातीची ने-आण करीत होता. आणलेली माती टाकण्याचे काम चालू असताना मागील बाजूला साईड दाखविण्याचे काम मनोजकुमार बैगा हा करीत होता. मात्र चालक मनोज कैल प्रजापती यांच्या बेफिकिरपणामुळे डंपरचे मागील चाक मनोजकुमार बैगच्या पाय व पोटावरून गेले. त्याला अधिक उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या बाबतची तक्रार मनोजकुमार बैगचे चुलते लवकुश बैगा यांनी राजापूर पोलीस स्थानकात केली. या तक्रारीमध्ये ट्रक चालक मनोज कैल प्रजापती यांनी बेफिकीरपणे गाडी चालवल्याने आपल्या पुतण्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या बाबत अधिक तपास राजापूर पोलीस करीत आहेत.