आर्थिक कंपन्यांच्या समभागांच्या घसरणीचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील सलगच्या तेजीला अखेर शुक्रवारच्या सत्रात विराम मिळाला आहे. भारतीय भांडवली बाजारात महिना अखेरीच्या काही दिवस तेजीचा कल कायम राहिला होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गुंतवणूकदार काळजीत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 984 अंकांनी घसरुन बंद झाला आहे.
दिवसभरातील कामगिरीमध्ये आशियातील शेअर बाजारात घसरणीचा कल राहिला असून याच दरम्यान देशातील बाजारातील आर्थिक कंपन्यांच्या समभागात मोठय़ा प्रमाणात विक्रीचा प्रभाव राहिल्याने भारतीय बाजार प्रभावीत झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्स 983.58 अंकांसह 1.98 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 48,782.36 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 263.80 अंकांनी प्रभावीत होत 1.77 टक्क्यासोबत निर्देशांक 14,631.10 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या नकारात्मक कामगिरीने दिवसभरात सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे समभाग जवळपास 4 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एशियन पेन्ट्स, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टीसीएस आणि मारुती सुझुकीचे समभाग घसरणीतच बंद झाल्याची नोंद केली आहे. तेजीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये ओएनजीसी, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब आणि बजाज ऑटोचे समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे आर्थिक कंपन्यांच्या समभागात मोठी विक्री राहिल्याने देशातील शेअर बाजार घसरुन बंद झाला आहे. यासोबतच चीनमध्ये औद्योगिक उत्पादनातील वृद्धीचा कल एप्रिलमध्ये कमी प्रमाणात राहिल्याच्या कारणास्तव उद्योगक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदार काळजीत राहिल्याचे पहावयास मिळाले.