मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे आदेश ;
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधित रूग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी जळाऊ लाकडाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी यांचे ई-टेंडरिंग करण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले आहेत. खर्च प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
अत्यसंस्काराच्या प्रक्रियेमध्ये शेण्यांबरोबर जळाऊ लाकडाचा वापर केला जातो. माहुलीच्या कैलास स्मशानभूमीलगत असणाऱया एका वखारीतून ही लाकडे उपलब्ध केली जातात. एक मण लाकडाचे तीनशे रूपये शुल्क आकारले जाते. मात्र, अग्निकुंडाची क्षमता प्रत्यक्षात सहा मण लाकडाची असताना बिलांवर बारा मण लाकडाची नोंद केल्याच्या पावत्या उपलब्ध झाल्या आहेत. बारा मण लाकडाचे तीनशे रूपये व ट्रँक्टर भाडे दोनशे रूपये असे 3 हजार 800 रूपये बिल पालिकेला आकारले जाते. याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ई-टेंडरिंग करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
अभिजित बापट म्हणाले, अंत्यविधी प्रक्रिया मृताच्या नातेवाईकांच्या भावनेचा विषय असतो. कोरोना काळात जिह्याचे ठिकाण म्हणून ही आपत्कालीन सेवा पालिकेने अत्यंत नेटाने सुरू ठेवली आहे. अंत्यविधी प्रक्रियेचे वार्षिक दर मंजूर आहेत. मात्र जळाऊ लाकडाचा पुरवठा करणारा एकच ठेकेदार आहे. भविष्यात त्याची मक्तेदारी तयार होऊ नये. यासाठी ई-टेंडरिंग करण्यात येत आहे. एकापेक्षा अनेक निविदा प्राप्त होऊन स्पर्धात्मक दरातून कमी दराची निविदा प्राप्त होईल. यात खर्च कपात आणि पारदर्शकपणा या दोन्ही प्रक्रिया साध्य होणार आहेत. काही दिवसांत ही निविदा प्रसिद्ध करण्यात येईल.