प्रत्यक्षात मंजूरीला ठेवण्यात आलेल्या टिपण्यावर जुन्याच अधिकाऱयांच्या सह्या
प्रतिनिधी/ सातारा
अंत्यसंस्कारासाठी मृताच्या नातेवाईकांना अनुदान वाढवण्याचा विषय पालिकेच्या सभेच्या अजेंडय़ावर होता. त्या विषयात भारीच रहस्य दडले आहे. पूर्वी एक हजार अनुदान दिले जात होते आता चार हजार दिले जाणार आहे. कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. मग अनुदान नेमकं कशासाठी तर शववाहिका अन् लागणाऱया साहित्यासाठी असा उल्लेख आरोग्य विभागाने केला आहे. जी टिप्पणी तयार करुन जोडली आहे. त्या टिप्पणीवर ज्यांच्या सह्या आहे. ते अधिकारी पालिकेत सध्या कामच करत नाहीत. तसेच 2020-21 साठी 7 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारनाम्याचे एकेक किस्से ऐकावे तेवढे नवलच वाटते आहे. नेत्यांच्या खास जवळ असले की काहीही करा अन् आपला तेवढा खिसा भरा अशी प्रक्रिया सध्या सुरू आहे. सातारा पालिकेच्या दि. 3 फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत क्रमांक 26 चा विषय मजेदार होता. मृताच्या नातेवाईकांना अनुदानात वाढ करण्यात यावी, असे त्यात म्हटले आहे. परंतु मृताच्या नातेवाईकांना नाही तर हे अनुदान मृतदेह कैलास स्मशानभूमीपर्यंत पाठवणाऱयांना अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळांना देण्यात येणार आहे. 2011 पूर्वी अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळांना 500 रुपये अनुदान म्हणून दिले जात होते. त्यांनंतर 1 हजार करण्यात आल्याचे म्हटले आहे. शहरात अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ म्हणून काम करणारे अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळ सातारा, फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ, नगरसेवक कै. शरद लेवे (अप्पा) स्मृती प्रतिष्ठान चिमणपुरा, भैरवनाथ, मारुती, गणपती, नृसिंह देवस्थान ट्रस्ट गोडोली, वैकुंठ अंत्यसंस्कार सहायक मंडळ करंजे या पाच मंडळांना निधी म्हणून 1 हजार दिला जातो. झालेल्या सभेत 4 हजार वाढवून मिळावे असा उल्लेख आहे.
वास्तविक मृत नातेवाईकांना अनुदान हा शब्द जेव्हा प्रयोगात आणला गेला आहे तेव्हा नेमके अनुदान कोणाला जाते तर आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामध्ये लावलेले दर ही धक्का देणारे आहेत ते पुढीलप्रमाणे एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी 2400 रुपयांच्या 800 शेणी, चालकाचे एका ट्रिपचे 500 रुपये, सात मीटर पांढऱया कपडय़ाचे 250 रुपये, 1 मीटर लाल कापडाचे 50 रुपये, 2 गाडगी 50 रुपये, चंदनाचे लाकूड 50 रुपयांचे, 50 रुपयांची दोरी, अबीर, गुलाल, उदबत्ती, काडीपेटी 100 रुपये, कापूर एक पुडा 50 रुपयांचा, गाडी भाडे डिझेलसहित 500 रुपये असे 4 हजार रुपये गृहीत धरले आहेत.
मात्र, मृताच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी अनुदान या नावाखाली तब्बल चौपट किंमत वाढवण्याचा घाट घातला आहे. तसेच शेणी, कापडाचे व अबीर बुक्का हे नातेवाईक स्वतःहून आणतात. असे असताना हा विषय घेतला गेला आहे. त्या विषयावर जे अधिकारी सध्या पालिकेत काम करत नाहीत. त्यांच्या सह्या आहेत. म्हणजेच जुने तारखेवरुन विषय घेण्यात आला आहे. तसेच 2020-21 साठी 7 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उरलेली तरतूद चालू बजेटमध्ये करण्यात येणार आहे.