११ ते १४ मे दरम्यान ऑनलाईन होणार व्याखाने
सांगली / प्रतिनिधी
समाजात सध्या विज्ञानाच्या नावाने अनेक अशास्त्रीय प्रकार सुरू आहेत, त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर सोसावे लागत आहेत. याचा विचार करून अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जनजागरण करण्याचे ठरविले असून ११ ते १४ मे अखेर ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
फसव्या विज्ञान (स्यूडो सायन्स) विरोधातील लढाई हा अंनिस चळवळीचा पुढील अजेंडा होणार आहे. त्यामुळे या विषयासंदर्भात कार्यकर्ते व जनतेचे प्रबोधनाचा एक भाग म्हणून दि. ११ मे ते १४ मे रोजी चार दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आलेली आहे. ही सर्व व्याख्याने दररोज सायं. ५ वाजता झूम आणि फेसबुक पेजवर होतील.
पहिल्या दिवशी, मंगळवार ११ मे रोजी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘छद्मविज्ञान विरोधी विशेषांकाचे प्रकाशन’ आयसर पुणे येथील जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजीत रथ यांच्या हस्ते होईल, या प्रसंगी डॉ. रथ हे ‘फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान देतील.
दुसऱ्या दिवशी, बुधवार, १२ मे रोजी छद्मविज्ञानाचे अभ्यासक प्रा. प.रा.आर्डे (सांगली) हे ‘ फसव्या विज्ञानाचा ऑक्टोपस’ या विषयावर बोलतील. तिसऱ्या दिवशी, गुरूवार, १३ मे रोजी वाई येथील स्रीरोग तज्ज्ञ व विज्ञान लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर हे ‘छद्म वैद्यक : फसव्या उपचारांचे मायाजाल ‘ या विषयावर बोलतील. चौथ्या दिवशी शुक्रवार, १४ मे रोजी मनोविकार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांच्या भाषणाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. या प्रसंगी ते ‘लोक फसव्या विज्ञानाला का भुलतात ?’ या विषयावर मार्गदर्शन करतील.
येथे होणार लाईव्ह प्रसारण
या सर्व व्याखानांचे लाईव्ह प्रसारण नरेंद्र दाभोलकर थॉट्स, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, मॅक्स महाराष्ट्र या फेसबुक पेजेस वर होईल. या व्याखानांचा लाभ घ्यावा असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राद्वारे करण्यात आले आहे.