प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव येथील रामदेव हॉटेलशेजारी हेरॉईन विकणाऱया चौघांना सीआयडी अंमली पदार्थविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी येथील द्वितीय जिल्हासत्र न्यायालयामध्ये सुरू होती. त्या ठिकाणी हे चौघेही दोषी आढळले असून यामधील मुख्य आरोपीला 15 वर्षांचा कठीण कारावास आणि 5 लाख रुपये दंड तर तीन आरोपींना प्रत्येकी 10 वर्षे कारावास आणि 1 लाखाचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
शिवकुमार लिंगाप्पा हिरेमठ (वय 38), परशुराम हणमंत नायक (वय 31, दोघेही रा. अमीनगड, जि. बागलकोट), राजाराम शशिकांत सुखे (वय 32, रा. गोवा), अन्वर गफुरसाब मसापती (वय 50, रा. अमीनगड, जि. बागलकोट) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. यामधील अन्वर गफुरसाब मसापती हा मयत झाला आहे. शिवकुमार हा यामधील मुख्य आरोपी आहे. त्याला 15 वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
हे सर्व जण 29 जून 2016 रोजी दुपारी 3 च्या सुमारास हेरॉईन विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सीआयडी पथकाचे पोलीस एन. व्ही. बरमनी यांनी धाड टाकून या चौघांना अटक केली. त्यांच्याकडील 18 लाख रुपये किंमतीचे 360 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. त्यानंतर त्यांच्यावर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी साक्षी आणि मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये सर्व जण दोषी आढळले. या सर्वांना न्यायाधीश जे. नंजुडण्णवर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून जी. के. माहुरकर यांनी काम पाहिले.
तीन महिन्यांतील तिसऱया खटल्यातही शिक्षा
जिह्यात विविध ठिकाणी अंमलीपदार्थ विक्री करत असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोप दाखल केले. या खटल्यांमधील जी. के. माहुरकर यांनी सरकारी वकिलाची भूमिका उत्तमरीत्या पार पाडली. त्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करून या तिन्ही खटल्यांतील आरोपींना चांगलाच दणका दिला आहे. यापूर्वी आकाश देसाई यालाही शिक्षा देण्यामध्ये जी. के. माहुरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.