वृत्तसंस्था/ कोलंबो
‘हेरॉईन’ हा अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली लंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिहान मदुशनका याला लंकन पोलिसांनी अटक केली आहे. 25 वर्षीय मदुशनकाला दोन आठवडय़ाच्या कालावधीसाठी पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशानी दिला आहे.
2018 साली मदुशनकाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात हॅट्ट्रीक नोंदविली होती. तसेच त्याने 2018 साली बांगलादेशविरूद्ध दोन टी-20 सामने खेळले होते. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले. रविवारी पन्नला शहरामध्ये मदुशनकाला मोटारीतून जाताना पोलिसांनी अडविले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ दोन ग्रॅम हेरॉईन हा अंमलीपदार्थ आढळला. कोरोना व्हायरस महामारीमुळे लंकेत अंमलात आणलेली संचारबंदी मंगळवारपासून शिथिल केली जाणार आहे. दरम्यान 20 मार्चपासून लंकन शासनाने अमलात आणलेल्या नियमांचा भंग केल्याबद्दल सुमारे 65000 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.