राज्य सहकारी बँकेच्या विशेष आमसभेत निर्णय : गेल्या 24 वर्षांपासून थकले होते कर्जाचे व्याज,31 मार्चपर्यंत 6 कोटी वसूल होण्याची बँकेला अपेक्षा
पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेने दीर्घकाळ थकीत राहिलेली अनेक कर्जे आणि त्यांवरील व्याज यावर तोडगा काढला असून 1993 ते 2017 या 24 वर्षांच्या काळात ज्या कर्जदारांचे थकीत कर्ज होते, त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतल्यानंतर शनिवारी झालेल्या विशेष आमसभेत या निर्णयाला मान्यता घेण्यात आली. 24 वर्षे थकलेल्या कर्जावरील सुमारे 11 कोटी ऊपये व्याज माफ करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उल्हास फळदेसाई यांनी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पणजी येथील बँकेच्या सभागृहात शनिवारी घेण्यात आलेल्या विशेष आमसभेनंतर चेअरमन फळदेसाई यांनी वरील माहिती दिली. या विशेष आमसभेला व्हाईस चेअरमन पांडुरंग कुट्टीकर, संचालक उमेश शिरोडकर, दत्तात्रय नाईक, प्रेमानंद शिरोडकर, उपासो गावकर, राजेश देसाई, मैथिली परब, चित्रा वायंगणकर, प्रभाकर गावकर, व्यवस्थापकीय संचालक अनंत चोडणकर व सरकारी प्रतिनिधी म्हणून विनोद नाईक उपस्थित होते.
मार्चपर्यंत 6 कोटींची होणार वसुली
चेअरमन उल्हास फळदेसाई म्हणाले, बँकेतर्फे घेण्यात आलेल्या विशेष आमसभेत जुन्या कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यास मान्यता घेण्यात आल्याने जुनी कर्जे निकालात निघणार आहेत. बँकेच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्त्वे तपासण्याबरोबरच कायदेशीर सल्ला घेऊनच बँकेच्या विशेष आमसभेपुढे हा निर्णय ठेवला होता. त्याला मान्यता घेतली आहे. कर्जे वसुल करण्यासाठी बँकेने विशेष मोहीम राबवली असल्याने 31 मार्च 2023 पर्यंत सुमारे 6 कोटींहून अधिक कर्ज वसुली होणार आहे.
अन्य 44 प्रकरणांचे 82 लाख व्याज माफ
1993 ते 2000 या कळातील थकलेल्या 9 कर्ज प्रकरणातील व्याज माफ करण्याच्या निर्णयालाही बँकेच्या विशेष आमसभेत मान्यता घेण्यात आलेली आहे. 2001 ते 2010 या दहा वर्षातही थकीत कर्जाची 44 प्रकरणे होती. ही प्रकरणे निकालात काढण्यासाठी सुमारे 7 टक्के व्याज माफ करण्याच्या निर्णयास मान्यता घेण्यात आली. या 44 कर्ज प्रकरणामधून सुमारे 82 लाख 46 हजार ऊपयांचे व्याज माफ होणार आहे, असेही चेअरमन फळदेसाई यांनी सांगितले.
51 प्रकरणांतील 5 टक्के व्याज माफ
2010 ते 2017 या काळात कर्जदारांनी विविध प्रकारची वाहने खरेदी, शेती कसणे, लहान व्यवसाय सुरू करणे व इतर बारिकसारिक कामांसाठी कर्जे घेतली होती. या काळातही सुमारे 51 प्रकरणे ही थकीत कर्जाची होती. यावर उपाय म्हणून बँकेने 5 टक्के व्याज माफ केले आहे. या 51 कर्ज प्रकरणातून माफ केलेल्या व्याजाची रक्कम ही 58 लाख 58 हजार इतकी असल्याचे फळदेसाई म्हणाले.
अनेक बुडीत बँकांची नोंदणी रद्द
गोवा मुक्तिनंतर ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या विविध सेवा सोसायट्या, कन्झ्युमर्स सोसायट्या, मजूर सोसायट्या, ग्राहक सहकारी सोसायट्या या लहान-सहान व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी गावातील लोकांना उपयुक्त ठरत होत्या. परंतु 1971 पासून ह्यातील अनेक सोसायट्या बुडीत निघाल्या आहेत. बुडीत निघालेल्या सोसायट्यांबाबत निर्णय घेताना सोसायटींची बँक नोंदणी रद्द करण्याच्या निर्णयासही गोवा राज्य सहकारी बँकेच्या विशेष आमसभेत मान्यता घेण्यात आली आहे. बुडीत निघालेल्या या सेवा सोसायट्यांचे व्याज व कर्ज माफीची रक्कम सुमारे 4 कोटी 99 लाख 72 हजार 879 इतकी आहे. बुडीत असलेल्या सोयायट्यांचा आता व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आला असून, त्यांचे नोंदणीकरणही रद्द झाले आहे.
बँकेचा कारभार आणखी सुरळीत होणार
बँकेचा कारभार सुधारण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाने कोणतीही कसूर सोडलेली नाही. गेल्या दोन वर्षांत बँकेला आम्ही सुस्थितीत आणले आहे. थकीत कर्ज व त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर तो विशेष आमसभेत ठेवणे गरजेचे होते. आता या विशेष आमसभेत थकीत कर्जावरील व्याज माफ करण्यास मान्यता मिळाल्याने बँकेचा कारभार आणखी सुरळीत होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्त्वे आणि तज्ञ समितीचा अहवाल आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
– उल्हास फळदेसाई, चेअरमन, गोवा राज्य सहकारी बँक