पद्मश्री विनायक खेडेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / फोंडा
ज्या ज्या गोष्टीतून ज्ञान मिळवता आले ते मिळवत गेलो. या अखंड ज्ञान साधनेच्या हव्यासापोटीच जीवनात यशस्वी झालो, असे प्रतिपादन भारत सरकारचा पद्मश्री सन्मान लाभलेले ज्येष्ठ लोकसाहित्य अभ्यासक विनायक खेडेकर यांनी केले. प्रोबस क्लब ऑफ फोंडा हिल टाऊन व प्रोबस ट्रस्ट मार्फत माधवराव ढवळीकर ट्रस्टच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सव व स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झालेल्या या मेळाव्यात विनायक खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, बांदोडय़ाचे सरपंच राजेश नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, डॉ. केतन भाटीकर, क्लबचे अध्यक्ष अशोक कुरी, ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे, गुणा नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आमदार सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते विनायक खेडेकरांचा सत्कार करण्यात आला. लहानपणी शाळेत जाता आले नाही. त्यामुळे जेमतेम चौथीपर्यंतच शिक्षण झाले. मात्र शिक्षण व ज्ञान साधनेचे महत्त्व कळू लागल्याने नियोजित कार्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. त्यामुळेच लोकसाहित्याचे संकलन व अन्य विषयावर संशोधनपर लिखाण करता आले, असे खेडेकर पुढे बोलताना म्हणाले. राजेश नाईक, डॉ. केतन भाटीकर, राजेश कवळेकर यांची यावेळी भाषणे झाली. नवदुर्गा महिला मंडळाच्या पथकाने स्वागतगीत सादर केले. अशोक कुरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणा नाईक यांनी तर जयवंत आडपईकर यांनी आभार मानले. मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.