सांगलीच्या संध्याराणी देशमुख, विलास कांबळे व डॉ. विनोद परमशेट्टी यांना पुरस्कार
सांगली/प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे २८ वे अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलन सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दि. २६ डिसेंबर रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार आहेत. या संमेलनात सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिक्षक संध्याराणी देशमुख, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी विलास कांबळे व डॉ. विनोद परमशेट्टी यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
श्रीमती देशमुख या सांगली जिल्ह्याच्या कन्या असून राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक पदाचा कार्यभार त्यांनी समर्थपणे पेलला आहे. त्याचबरोबर सामाजिक कामाची आवड असणाऱ्या श्रीमती देशमुख यांना लेखन व वाचनाची आवड आहे. उप प्रादेशीक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी सांगली जिल्ह्यात परिवहन क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांचा लौकीक आहे. डॉ. विनोद परमशेट्टी हे सांगली जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव असून रुग्णावर ते अल्पमुल्यात उपचार करतात. त्यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येत आहे. अशी माहिती अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली.