वार्ताहर/ अगसगे
सरकार महिला व बालकल्याण खात्यामार्फत अंगणवाडीत शिकणाऱया मुलांना व गर्भवती महिलांना पौष्टिक आहार मिळावा, या उद्देशाने अंडी देते. अंगणवाडी कर्मचाऱयांनी एका महिन्याची अंडी गायब करून काळय़ा बाजारात विक्री केल्याचा प्रकार शुक्रवारी अगसगे येथे उघडकीस आला.
अगसगे गावामध्ये एकूण चार अंगणवाडी आहेत. यामध्ये तीन अंगणवाडीमध्ये हजारो अंडी गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला. शनिवारी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी याची माहिती ग्राम पंचायत सदस्यांना दिली. ग्राम पंचायत सदस्यांनी महिला व बालकल्याण खात्याला कळवली. अधिकाऱयांनी गावातील अंगणवाडीला भेट दिली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी तिन्ही अंगणवाडी कार्यकर्त्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. दोन महिन्यांचा अंडय़ांचा कोटा अंगणवाडी कार्यकर्त्यांनी महिलांना व लहान मुलांना केवळ एकाच महिन्याचा पुरवठा केला. मात्र रजिस्टरमध्ये दोन महिने दिल्याचा उल्लेख होता. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी आपण केलेली चूक मान्य केली व ते अंडे पुन्हा आम्ही स्वतः लहान मुलांना व गर्भवती महिलांना देतो, असे सांगितले.
मात्र, ग्रामस्थांनी अंडे दिले तरी यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. कारवाई करण्याचे आश्वासन महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी चंद्रशेखर एस. सुखसारे व इंदिरा पाटील यांनी त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करतो, अशी ग्वाही दिली.
लहान मुले व गर्भवती महिलांचा घास काढून घेणाऱया या लालची अंगणवाडी महिलांवर योग्य ती कारवाई करावी. अंगणवाडीमध्ये लहान मुलांना व गर्भवती महिलांना वेळेत रेशन मिळत नाही, असा आरोपही अनेक वेळा ग्राम पंचायत सदस्यांकडे ग्रामसभेमध्ये वारंवार करण्यात आला आहे. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. या तिन्ही अंगणवाडी कर्मचाऱयांवर योग्य ती कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
यावेळी ग्राम पंचायत विकास अधिकारी वीणा हडपद, उपाध्यक्ष भैरू कंग्राळकर, सदस्य अमृत मुद्यांवर, गुंडू कुरेनवर, उमा कोलकार, यल्लाप्पा पाटील, ग्रामस्थ सुभाष पाटील, लगमा सनदी आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.