प्रतिनिधी/ बेळगाव
अग्निशमन दलातील एका अधिकाऱयाचा रेल्वेरूळ ओलांडताना रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी भुईकोट किल्ल्याच्या मागे हा प्रकार उघडकीस आला आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
कलमाप्पा रुद्राप्पा माळगी (वय 51, रा. पाचवा क्रॉस, समर्थनगर) असे या दुर्दैवी अधिकाऱयाचे नाव आहे. बेळगाव येथील अग्निशमन दलाच्या ठाण्यात असिस्टंट फायर ऑफिसर म्हणून ते सेवा बजावत होते. रविवारी सकाळी रेल्वेरूळाशेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
खिशातील मोबाईलवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. नातेवाईकांना भेटून समर्थनगर येथील आपल्या घरी जाताना ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.