प्रतिनिधी/ पणजी
अग्निशामक दल आणि तत्पर सेवा संचालनालयाच्या वार्षिक प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा पणजीतील मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये पार पडला. विशेष कामगिरी आणि उल्लेखनीय काम केलेल्या दलातील सुमारे 99 जवानांना (विविध गटातील) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली.
डॉ. सावंत यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कामाची दखल व पोचपावती म्हणून त्यांचा प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात येत असल्याचे सांगितले. आता कोरोनाचे संकट व सावट असतानाही दलाचे जवान चांगले काम करीत असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.
दलातील विविध गटातील जवान तसेच इतर कर्मचारी, अधिकारी यांना विशेष प्रगतीबाबत कौतुकाची थाप देण्याची खात्याची वार्षिक परंपरा आहे. 14 एप्रिल या राष्ट्रीय अग्निशामक दिनी हा सोहळा आयोजित करण्यात येतो. तथापि कोरोना लॉकडाऊनमुळे तो स्थगित करून पुढे ढकलण्यात आला आणि आता तो झाला. गेल्या 14 वर्षात 700 पेक्षा अधिकजणांना खास कामगिरीबाबत विशेष पदके, पुरस्कार, प्रशस्तीपत्रे देण्यात आल्याचे अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी सांगितले. मेनन यांनी स्वागत, प्रास्ताविक केले तर अजित कामत यांनी सूत्रसंचालन करून शेवटी आभार मानले.