पेट्रोल, डिझेल महागाईविरोधात काँग्रेसची सायकल रॅली
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात भाजप सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोणत्याही परिस्थितीत 60 रुपयांच्या वर जाणार नाहीत, असे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता तर झालीच नाही, उलट मोदी सरकारने गत पाच वर्षांत पेट्रोल व डिझेलच्या किंमती अनुक्रमे 250 व 820 टक्क्यांनी वाढविल्या. तर गॅस सिलिंडरच्या किंमती दुप्पट करून जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या अल्का लांबा यांनी केला आहे.
पेट्रोल, डिझेल व गॅस महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने पणजीत आयोजित केलेल्या सायकल रॅलीवेळी त्या बोलत होत्या. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला अध्यक्ष बिना नाईक, अमरनाथ पणजीकर विजय भिके, वरद म्हार्दोळकर, शंकर किर्लपालकर, नौशाद चौधरी, ज्यो डायस, जनार्दन भंडारी, तुलियो डिसोझा, रुडाल्फ फर्नांडीस, सुधीर कांदोळकर, हिमांशू तिवरेकर, यांच्यासह अनेक गटाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती सतत वाढवून सर्वसामान्य लोकांना लुटले आहे. या महागाईविरोधात जागृती करण्यासाठी काँग्रेसने देशभरात निदर्शने, आंदोलने आरंभ केली आहेत. त्याचाच भाग म्हणून आपण गोव्यात आले आहे, असे लांबा यांनी पुढे सांगितले.
गत सुमारे सात वर्षांपासून महागाई सतत वाढतच राहिली आहे. भाजप सरकार जनतेची लूट करत आहे. या कालावधीत इंधनावरील विविध करांच्या रुपाने या सरकारने सुमारे 7.85 लाख कोटी जमा केले आहेत. निदान आता तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 35 रुपये प्रती लिटर एवढय़ा खाली आणाव्या, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या सरकारच्या कार्यकाळात लोकांच्या नशिबी बुरे दिन आले. 2012 मध्ये 60 रुपयात मिळणारे पेट्रोल 2021 पर्यंत 100 रुपयांवर पोहोचविले. लोकांना आता तरी जागे व्हावे व या सरकारला त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन दिगंबर कामत यांनी केले.
अन्य उपस्थितांनीही यावेळी विचार मांडले. पणजीतील काँग्रेस मुख्यालयाकडून सायकल रॅली प्रारंभ झाली व कदंब स्थानकपर्यंत त्यांनी फेरी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या हाती पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करणारे फलक होते. सर्वांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीचा एकमुखी निषेध करत घोषणांनी परिसर दणाणून सोडला.